टाटा ग्रुपला गुन्हेगारी पद्धतीने उद्ध्वस्त केले जात आहे, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला. विशेष म्हणजे, यावर कोणताही उद्योगपती चकार शब्दही काढायला तयार नाही.
या गुन्ह्यांसाठी आम्ही न्याय मिळवून देऊ, असा दावाही त्यांनी केला. टाटा सन्सच्या नेतृत्वावरून टाटा ग्रुपमध्ये सुरू असलेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर राहुी गांधींनी ही टिप्पणी केली आहे. या संघर्षामुळे विश्वस्तांमध्ये फूट पडली असून तो टाटा सन्सच्या संचालक मंडळापर्यंत पोहोचला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशातील उद्योगपतींना यावर बोलण्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधी म्हणाले, अजून किती काळ तुम्ही शांत बसणार आहात? जोपर्यंत ते तुमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत शांत राहणार का? भारतातील उद्योग मोदी आणि शहांसाठी खेळणे झाले आहे. तुमच्यात (उद्योगपती) याविरोधात बोलण्याचे धाडस नसेल पण आमचे तसे नाही. पण आम्ही या गुन्ह्याविरोधात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अमित शहा यांना लक्ष्य केले.
अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न – सितारामन्
काँग्रेस नेते उद्योगपतींना अविश्वास आणि विषारीपणा पसरवण्यासाठी आपल्यासोबत सामील होण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी प्रत्येक मुद्द्याचे राजकारण करणे टाळावे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दिले.
सीतारामन् म्हणाल्या, मोदी सरकार भारतीय उद्योगांना रोजगार निर्मिती करणारे आणि आर्थिक विकासाचे चालक म्हणून महत्त्व देते. मात्र, विरोधी पक्षनेते वारंवार भारतीय उद्योग आणि उद्योजकांची निंदा करत आहेत. आपल्या संकुचित राजकीय हेतूंसाठी निराधार आरोप करण्याऐवजी विधायकपणे संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.