🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"पाठीत खंजीर उपसला!" ३ जागा गमवताच भाजपचा शिवसेनेवर भयंकर हल्लाबोल; युतीधर्मावरून वाद पेटला!

​"पाठीत खंजीर उपसला!" ३ जागा गमवताच भाजपचा शिवसेनेवर भयंकर हल्लाबोल; युतीधर्मावरून वाद पेटला!


महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या तिन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला. 



दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीने शिक्षकांच्या दोन्ही जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामध्ये पुण्यात काँग्रेसची तब्बल १८ वर्षे ताब्यात असलेली पारंपरिक जागा भाजपने जिंकून मोठा फेरबदल घडवून आणला.



मात्र, ५ पैकी केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागल्याने महायुतीत तीव्र नाराजी पसरली असून आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने थेट मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर (शिंदे गट) पराभवाचे खापर फोडले आहे. "एका जागेच्या हव्यासापोटी तीन जागा गमावल्या!" - भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात 




भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मित्रपक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शिवसेनेने महायुतीची एकजूट मोडीत काढल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. नवनाथ बन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीला सुरुंग लावला. 

त्यांना पडलेली मते पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पारड्यात आली नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (मराठवाडा पदवीधर) मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसला. शिवसेनेने जर महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामाणिकपणे सहकार्य केले असते, तर आज पाचही जागांवर महायुतीचा झेंडा फडकला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि हाताशी आलेल्या तीन जागांवरील विजयाची संधी गमावली."




महायुतीतील मित्रपक्षांवर उपस्थित झालेले सवाल

एका जागेच्या स्वार्थासाठी शिवसेनेने महायुतीचे मोठे नुकसान केले असल्याची भावना भाजप गोटात निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने 'महायुतीचा धर्म नेमका कोणी पाळला आणि कोणी मोडला?' असा थेट सवाल आता भाजपच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे निकालानंतर महायुतीतील घटक पक्षांमधील दरी अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.