धक्कादायक! सांगलीच्या विश्रामबाग पोलिसांच्या वरदहस्ताने 'लक्ष्मीदर्शन' परिसरात खुलेआम ऑनलाईन कसीनो सुरु; तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना खाकी सुस्त!
सांगली :- शहरातील अत्यंत पॉश आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबाग परिसरातील 'लक्ष्मीदर्शन' परिसरात सध्या कायद्याच्या आणि खाकी वर्दीच्या डोळ्यांदेखत एक बेकायदेशीर काळा धंदा जोरात सुरू आहे. दुकानाला पडदे लावून सर्रासपणे 'ऑनलाईन कसीनो' (जुगार अड्डा) चालवला जात असून, या गंभीर प्रकारामुळे परिसरातील गोरगरीब जनता आणि तरुण मुले या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात अडकत आहेत. मात्र, हे सर्व उघडपणे सुरू असतानाही विश्रामबाग पोलीस मात्र 'गांधारीची भूमिका' घेत असून, त्यांनी या प्रकारावर डोळेझाक केली आहे.
पोलिसांनी का बांधली डोळ्यांवर पट्टी?
एखाद्या दुकानात किंवा बंदिस्त जागेत अशा प्रकारे ऑनलाईन जुगाराचा अड्डा चालत असेल आणि परिसरातील नागरिकांना त्याची पूर्ण माहिती असेल, तर स्थानिक पोलिसांना याची कुणकुण कशी लागत नाही? असा संतप्त सवाल आता सांगलीकर नागरिक विचारत आहेत. पोलिसांच्या नाकाखाली हा बेकायदेशीर गोरखधंदा सुरू असतानाही पोलीस कारवाई का करत नाहीत? यामागचे गूढ काय आहे? हा धंदा वरिष्ठांच्या आशीर्वाद किंवा हप्त्याशिवाय चालणे अशक्य असल्याचे बोलले जात असून, यामुळे आता सांगली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरुण पिढी जुगाराच्या खड्ड्यात, नागरिक आक्रमक
सध्याच्या काळात ऑनलाईन जुगाराच्या नादात अनेक तरुण मुले आणि अल्पवयीन मुले उद्ध्वस्त होत आहेत. घाम गाळून कमावलेले पैसे किंवा घरचे पैसे या ऑनलाईन कसीनोच्या मोहात फसवले जात आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना, ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच विश्रामबाग पोलीस याकडे दुर्लक्ष करून या गैरप्रकाराला खतपाणी घालत आहेत का? असा संताप व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाला सज्जड इशारा:
आता केवळ मूकदर्शक बनून राहण्याची वेळ निघून गेली आहे. जर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने या ऑनलाईन कसीनोवर कठोर कारवाई करून हा अड्डा मातीत मिळवला नाही, तर सांगलीकर नागरिक आता गप्प बसणार नाहीत; तर तीव्र आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेतील, असा संतप्त इशारा नागरिकांकडून दिला जात आहे. आता यावर पोलीस अधीक्षक किंवा अप्पर पोलीस अधीक्षक या प्रकरणात स्वतः लक्ष घालून विश्रामबाग पोलिसांवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.