मिरज रेल्वे स्टेशन परिसरात शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणारा सराईत गुन्हेगार अवघ्या २ तासांत जेरबंद; महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई
मिरज :-मिरज रेल्वे स्टेशन चौकातील एका सलूनमध्ये नागरिकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या. अल्ताफ उर्फ हतेला अन्वर शेख (वय २९, रा. ख्वाजा गल्ली, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रताप कॉलनी झोपडपट्टी येथील रहिवासी मधुकर खंडाप्पा कांबळे हे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मिरज रेल्वे स्टेशन चौकातील ‘अरविंद हेअर कटिंग सलून’ येथे केस कापण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अल्ताफ उर्फ हतेला याने त्यांना शस्त्राचा धाक दाखवून, गंभीर दुखापत करण्याची व जिवे मारण्याची भीती घालून त्यांच्याकडील २५० रुपये बळजबरीने हिसकावून नेले.
याप्रकरणी १० ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२ तासांत आवळल्या मुसक्या:
गुन्हा दाखल होताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिरज रेल्वे स्टेशन परिसरात संशयित आरोपी फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लुटलेली रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार; यापूर्वी झाली होती तडीपारी:
आरोपी अल्ताफ उर्फ हतेला हा सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शरीर व मालमत्तेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी सन २०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये कारवाई करत त्याला सांगली जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार केले होते.
सदर धडक कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित धनगर, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुदमोळ, विनोद चव्हाण, सचिन दिनमेकर, राजेंद्र हारगे व चालक सतीशकुमार पाटील यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.