🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय युवा राजकारणात सांगलीचा डंका! भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर वीरेंद्र पाटील यांची निवड

राष्ट्रीय युवा राजकारणात सांगलीचा डंका! भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर वीरेंद्र पाटील यांची निवड


सांगली :-​ सांगलीचे युवा नेते तथा गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्यपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मान्यतेने आणि भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार हेमांग जोशी यांनी ही घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे सांगलीच्या तरुण नेतृत्वाला थेट राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे.


महाराष्ट्रातून मोजक्याच चेहऱ्यांना संधी

​या राष्ट्रीय समितीवर देशभरातून तरुण आणि धडाडीच्या चेहऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. यामध्ये बिहारच्या लोकप्रिय लोकगायिका तथा आमदार मैथिली ठाकूर यांच्यासह अनेक राष्ट्रीय पातळीवरील युवा चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून केवळ दोघांची या समितीवर निवड झाली असून, त्यात सांगليचे वीरेंद्र पाटील आणि मुंबईचे गुरदितसिंग वोहरा यांचा समावेश आहे.

​‘महाराष्ट्र नेक्स्ट’ उपक्रमाची दखल

भाजपचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज पाटील यांचे चिरंजीव असलेल्या वीरेंद्र पाटील यांनी कुटुंबाच्या राजकीय वारशासोबतच आपल्या स्वतंत्र युवा टीमच्या माध्यमातून भरीव कार्य केले आहे. पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वीरेंद्र यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नेतृत्व केले.

​राज्याच्या विकासाची नवी दिशा काय असावी?
​युवकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे धोरण कसे असावे?
​पर्यटन आणि उद्योग विकासातील नवीन संधी कोणत्या आहेत?

​या विषयांवर सविस्तर आणि अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केले होते. त्यांच्या या रचनात्मक कार्याची आणि युवा संघटनेतील सक्रिय सहभागाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. 

“भाजप नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास मी शंभर टक्के पात्र राहीन. देशामध्ये युवक हीच सर्वात मोठी शक्ती असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणे अत्यंत आनंददायी आहे,” अशा भावना निवडीनंतर वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.




​दिग्गजांची परंपरा लाभलेल्या संघटनेत वर्णी

​भाजप युवा मोर्चा ही देशातील अत्यंत प्रभावशाली आणि प्रमुख युवा संघटना मानली जाते. भूतकाळात या संघटनेने देशाला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. प्रमोद महाजन, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उमा भारती, अनुराग ठाकूर यांच्यासह पुनम महाजन आणि तेजस्वी सूर्या यांसारख्या नेत्यांनी यापूर्वी भाजयुमोच्या राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. आता याच गौरवशाली परंपरेच्या मालिकेत वीरेंद्र पाटील यांच्या रूपाने सांगलीच्या तरुण नेतृत्वाची भर पडली आहे. ​या निवडीमुळे सांगली जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळातून वीरेंद्र पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.