पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकाने 8 ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन केले होते.
हा अहवाल आज जारी केला केला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रात्री नानांनी जवळचा मित्र अमेय नाईक यांना फक्त मेसेज केला नाही तर कॉल देखील केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मित्र येईपर्यंत उशीर झाला होता, अखेर त्या रात्री नेमकं काय घडलं? हे समोर आले आहे.
नाना पाटेकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि त्यामागे कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार असल्याचे मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोना पावला येथील मणिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पणजी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पुतणे सचिन पाटेकर यांच्या समक्ष पंचनामा
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयमध्ये हलवण्यात आला होता. पंचांच्या उपस्थितीत आणि त्यांचे पुतणे सचिन पाटेकर यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला होता. डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा अहवाल सादर केला आहे.
पहाटे प्रकृती बिघडल्याचा मित्राला संदेश
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे अडीचच्या सुमारास कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. संदेशाला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नाईक यांना फोनही केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास संदेश पाहिल्यानंतर नाईक तातडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.त्यावेळी पाटेकर सोफ्यावर बेशुद्ध स्थितीत दिसून आले. नाईक यांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने रुग्णालयाची आपत्कालीन सेवा बोलावली. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.