🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एपीआय रवींद्र शेडगे निलंबित; विश्वास नांगरे पाटलांच्या कारवाईने वाहतूक पोलिसांत चलबिचल

एपीआय रवींद्र शेडगे निलंबित; विश्वास नांगरे पाटलांच्या कारवाईने वाहतूक पोलिसांत चलबिचल

नागपूर : वाहतूक शाखेत मोठ्या प्रमाणात वसूली होत असल्याचे चित्र असताना, ट्रॅव्हल्सकडून वसुली केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी कॉटनमार्केट विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) असलेले रवींद्र शेडगे यांना निलंबित केले.

वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेडकर यांनी याबाबत प्रस्ताव पाठविला होता. या घटनेने वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉटनमार्केट वाहतूक शाखा विभागातंर्गत गणेशपेठ परिसर येतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात. त्यांच्यावर कारवाईसाठी वाहतूक पोलिस या परिसरात असतात. या ट्रॅव्हल्सकडून वाहतूक पोलिसांद्वारे वसुली केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर याबाबत पोलिस आयुक्तांकडे एक लेखी तक्रार देण्यात आली होती.

त्यावरून त्यांनी पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांना चौकशीचे आदेश दिले. मिरखेलकर यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त गिरीश बने यांची चौकशी समिती नेमली. या समितीद्वारे केलेल्या चौकशीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शेडगे हे वसुली करीत असल्याची माहिती समोर आली होती. त्यातूनच त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविला. त्यानंतर काल रात्री शेडगे यांना निलंबित करण्यात आले.

वसुलीचा खेळ जोरात

कॉटन मार्केट विभागातर्गत सातत्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून वसुली केल्या जात असल्याची माहिती आहे. शेडगे यांच्यापूर्वी ही जबाबदारी एका हवालदाराकडे देण्यात आली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. त्यानंतर एपीआय शेडगे येताच, त्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार शेडगे यांनी एका नामांकित ट्रॅव्हल्सकडून चार हजार रुपयांची वसुली केल्याचे समजते.

झिरो टॉलरन्सची भूमिका

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडून पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या वसुलीबद्दल झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्यातूनच यापूर्वीही काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आता एपीआयच्या निलंबनानंतर हा पैसे घेणारा इशारा असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.