मुंबई : केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले असतानाही जवळपास तीन दशके डॉक्टर असल्याचे भासवून विविध कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी व देणग्या मिळविल्या. या निधीचा अपहार करून सुमारे ३० बँक खात्यांमधून १८८ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा प्रकार मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस आला आहे.
धर्मेंद्रकुमार सिंह असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, त्याने विविध न्यास, संस्था व खासगी कंपन्यांच्या माध्यमातून निधी मिळवून त्यातील रक्कम नातेवाईक, कर्मचारी, विश्वस्त तसेच अन्य लाभार्थ्यांशी संबंधित खात्यांकडे वळविल्याचा आरोप आहे.
सिंह याने बिहारमध्ये रुग्णालयातील मदतनीस म्हणून काम केले होते. त्यानंतर डॉक्टर असल्याची ओळख निर्माण करून त्याने आरोग्यविषयक उपक्रम, वैद्यकीय शिबिरे व सामाजिक कार्याच्या माध्यमातून संपर्क वाढविला. या माध्यमातून विविध कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी व देणग्या मिळविण्यात आल्याचा आरोप आहे.
कोल इंडिया समूहातील साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या कंपनीकडून ५० हजार नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी संबंधित न्यासाला फेब्रुवारी २०२५ मध्ये ३८ लाख २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. मात्र, बिलासपूर येथील लाभार्थींच्या नोंदींची नमुना पडताळणी करताना आधार क्रमांकाच्या आधारे तपासलेल्या ५४३ नोंदींपैकी ५२० नोंदींची खातरजमा करता आली नाही.
त्यामुळे प्रकल्पातील लाभार्थ्यांची माहिती बनावट असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला. विविध बँक खात्यांच्या प्राथमिक तपासणीत मोठ्या रकमा जमा झाल्यानंतर काही व्यवहार ७२ तासांच्या आत, तर काही रकमा सात दिवसांच्या आत अन्य खात्यांमध्ये वळविल्याचे आढळले. संबंधित न्यासाच्या खात्यांतून खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आल्याचे, तसेच आरोपीचे नातेवाईक, विश्वस्त व इतर संस्थांशी संबंधित खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित झाल्याचे तपासात उघडकीस आले.
फेब्रुवारी २०२६ मध्ये सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट या संस्थेकडून २३ लाख १७ हजार रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळाला होता. त्यानंतर काही काळातच वाहन विक्रेत्याच्या खात्यात २२ लाख २३ हजार रुपये हस्तांतरित झाल्याचे तपासात आढळले. या रकमेचा वापर वाहनखरेदीसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिटने जुहू येथील आरोपीच्या निवासस्थानी व कार्यालयात झडती घेतली. या झडतीत औषधे, वैद्यकीय उपकरणे, ओळखपत्रे, शिक्के, धनादेश पुस्तिका, संगणक, माहिती साठविण्याची साधने व विविध न्यास व कंपन्यांशी संबंधित कागदपत्रांसह सुमारे २२० वस्तू जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या औषधांमध्ये मुदत संपलेली औषधे तसेच 'केवळ सरकारी पुरवठ्यासाठी- विक्रीसाठी नाही' असा उल्लेख असलेल्या औषधांचाही समावेश असल्याचे तपासात नमूद आहे. या प्रकरणात सुमारे १८८ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची नोंद आरोपपत्रात आहे. निधीचा प्रत्यक्ष वापर, संबंधित खात्यांचे लाभार्थी व कथित आर्थिक गैरव्यवहारातील इतर व्यक्तींची भूमिका यांचा तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.