ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 3 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महेश (वय 36) हे पत्नी आणि मुलांसह राहत होते. रात्री कुटुंबातील सर्वांनी जेवण केले आणि त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. रात्री सुमारे 10 वाजता त्यांनी मॅगी खाल्ल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ होऊनही घरातील कोणतीही व्यक्ती बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला.
शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कुटुंबातील पाचही जण बेडवर मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये महेश (36), त्यांची पत्नी ललिता ऊर्फ ललतेश (34), मुलगा लड्डू (12), मुलगी मिस्टी (8) आणि सर्वात लहान मुलगी साक्षी (4) यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमागे विषबाधा, विषारी पदार्थाचे सेवन किंवा अन्य काही कारण आहे का, याचा तपास सुरू आहे. रात्री खाल्लेल्या अन्नामुळे हा प्रकार घडला का, याबाबतही अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे मॅगी खाल्ल्यामुळेच मृत्यू झाला, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही.घटनेची माहिती मिळताच रबूपुरा कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. फॉरेन्सिक पथकाकडून घरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या पोलीस सर्व शक्यता लक्षात घेऊन पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.