CJP आंदोलनाचा दणका! निवडणूक आयोगाकडून नियमांत मोठे बदल, एका व्यक्तीबाबतचा नियम अधिक कडक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात तसेच देशभरात राबवण्यात येत असलेल्या एसआयआरविरोधात कॉकरोज जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नाव हटवण्यासाठी दाखल करण्यात येणाऱ्या फॉर्म-७ बाबत हा निर्णय घेतला आहे. तसेच एकाच व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येणाऱ्या आक्षेपांना रोखण्यासाठी नवी मर्यादा निश्चित केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने या आदेशांमध्ये म्हटले आहे की, काही वैयक्तिक मतदारांकडून कुठल्याही सबळ कारणाशिवाय मोठ्या प्रमाणावर फॉर्म-७ अन्वये आक्षेप नोंवदण्यात आले आहेत, अशा घटना आमच्या निदर्शनास आल्या आहेत. या माध्यमातून ज्या मतदारांविरोधात आक्षेप घेण्यात आले, त्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पायाभूत पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कामाचा बोजाही वाढत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम १३(२) नुसार कुठल्याही मतदारसंघातील मतदार यादीत नाव दाखल करण्यावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव हटवण्यासाठीचा आर्ज फॉर्म-७ मध्ये असणं आवश्यक असतं. तसेच असा अर्ज हा त्या भागातील मतदार यादीत नाव असलेली व्यक्तीच दाखल करू शकते.
निवडणूक आयोगाने सांगितले की, एसआयआरच्याकालावधीदरम्यान, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बीएलए यांना मोठ्या प्रमामावर अर्ज देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही मर्यादा निश्चित आहेत. बीएलए ड्राफ्ट प्रसिद्ध होण्यापूर्वी एका दिवसात बीएलओला ५० हून अधिक अर्ज आणि त्यानंतर १० हून अधिक अर्ज दाखल करता येणार नाहीत.
तर वैयक्तिक मतदारासाठी मतदार यादी मेन्युअल २०२३ मध्ये आधीपासून तरतूद करून ठेवण्यात आली आहे. त्यानुसार कुठल्याही व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यात आलेले दावे आणि आक्षेप, स्वीकारले जाणार नाहीत. यामध्ये पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेल्या अर्जांचाही समावेश आहे. जर एकच व्यक्ती पाच हून अधिक अर्जांमध्ये आक्षेप घेणारा असेल तर ईआरओने त्याबाबत वैयक्तिकरीत्या क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असेल.
नेमका काय बदल झाला आहे? निवडणूक आयोगाने सांगितले की, ऑनलाईन माध्यमातून एका व्यक्तीला ६ अर्ज करता येतील. मात्र प्रत्यक्ष अर्जांची संख्या स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. तसेच ही बाब ईआरओ यांच्या विवेकबुद्धीवर सोडण्यात आली होती. त्यामुळे निर्णय घेण्यात अडथळे येत होते. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने ही नवी मर्यादा निश्चित केली आहे.
आता दावे आणि आक्षेप घेण्याचा संपूर्ण कालावधीत कुठलाही मतदार कमाल १० फॉर्म-७ दाखल करू शकेल. तर मतदार यादी सातत्याने अद्ययावत होत असताना ही मर्यादा दर महिन्याला ५ अर्ज एवढी असेल. हा नियम ऑलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हींवर लागू असेल.
निवडणूक आयोगाने नियम १७ अन्वये अपूर्ण या निश्चित प्रारूपात न भरलेल्या अर्जांना ईआरओ फेटाळून लावतील, हेही स्पष्ट केले आहे. फॉर्म-७ वर आक्षेप घेणाऱ्याची मूळ स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. केवळ शिक्क्याद्वारे काम भागणार नाही. तसेच ईआरओंना आर्ज करणाऱ्याच्या प्रामाणिकतेची पडताळणीही करावी लागणार आहे. तसेच याबाबत करण्यात आलेली तक्रार ही खोटी किंवा काल्पनिक असल्याचं निष्पन्न झालं तर लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम ३१ अन्वये जाणीवपूर्वक खोटा दावा करणाऱ्या अर्जदारावर कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.