🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात आरोग्य सेवेचा नवा अध्याय! सेवा रुग्णालयातील सुविधांचे लोकार्पण, प्रकाश आबिटकरांचे मोफत उपचारांचे आश्वासन

कोल्हापुरात आरोग्य सेवेचा नवा अध्याय! सेवा रुग्णालयातील सुविधांचे लोकार्पण, प्रकाश आबिटकरांचे मोफत उपचारांचे आश्वासन


कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी येथे केले.



कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे फित कापून लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नांदेकर, महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एल. कदम, कृष्णा डायग्नोस्टिकचे कार्यकारी अध्यक्ष आदर्श कर्नावत तसेच नगरसेवक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

रुग्ण तक्रारीसाठी अॅप

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, उपलब्ध निधीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य संवाद यात्रा सुरु करण्यात येत आहे. आरोग्य सेवांमधील त्रुटींबाबत नागरिकांना ऑनलाइन तक्रार करता यावी, यासाठी विशेष ॲप सुरु करण्यात आले आहे. लोकसहभागातून हे काम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत आहे.




रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील सुविधांवर नियमित देखरेख ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोल्हापुरात यलो फिव्हर लसीकरणाची सुविधाही सुरु करण्यात आली असून, आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मित्रा संस्थेच्या सहकार्याने शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. तसेच २०० बेडचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० बेडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सेवा रुग्णालयात अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. या सुविधांचा उपयोग कसबा बावडा, कदमवाडी परिसरासह जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होईल. भविष्यातही आणखी दर्जेदार सुविधा या रुग्णालयाला दिल्या जातील. या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.





राजेश क्षीरसागर म्हणाले, गोर गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या आणि उपचार करुन घ्यायचे असले तर हजारो, लाखो रुपयांचे कर्ज घ्यावे लागत होते. सेवा रुग्णालयात उपलब्ध होत असलेल्या या अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ कसबा बावडा व जिल्ह्यातील नागरिकांना निश्चित होईल. मित्रा या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पालकमंत्री प्रकाश आबिटकर करत आहेत, असे सांगून यापुढेही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा महापौर रुपाराणी निकम यांनी केल्या. सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सेवा रुग्णालयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या रुग्णालयाला पूर्व द व्हिक्टोरिया डायमंड जुबली हॉस्पिटल या नावाने संबोधले जात होते. सध्या रुग्णालयात बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भुलतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्य चिकित्सक, भुलतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी आदी कार्यरत आहेत.

या रुग्णालयात यलो फीवर व्हॅक्सिनेशन सेंटर, क्रिटिकल केअर युनिट, कॅथलॅब, ५० बेड रुग्णालयाचे २०० बेड रुग्णालयात श्रेणीवर्धन आदी सुविधा देण्यात येत आहेत. या रुग्णालयाच्या विस्तारामुळे गोरगरिबांना खाजगी रुग्णालयाच्या दर्जाचे उपचार आणि महागड्या चाचण्या आणि वैद्यकीय सुविधा विनामूल्य मिळणे सुलभ होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.