जळगाव : बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने साथीदारांसह जळगाव जिल्ह्यातील भोकर गावातील स्टेट बँक लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंकर जसक असे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्याने आपल्या साथीदारांसह बंदुकीचा धाक दाखवत आणि गोळीबार करत स्टेट बँकेत दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेत दरोडेखोरांनी बँकेतून तब्बल 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. मात्र, दरोडेखोरांच्या या कारवाईदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसामुळे हे सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. शंकर जसक, गजानन पवार, अंकुश चव्हाण, श्रवण चव्हाण असे या दरोडा प्रकरणातील आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दरोडा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार शंकर जसक हा पूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. 2023 मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बँक दरोड्याच्या प्रकरणात तो दोषी आढळला होता. या गुन्ह्यानंतर पोलीस विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता.
मात्र, तुरुंगात असताना शंकर जसक याची खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गजानन पवार याच्याशी ओळख झाली. कालांतराने या दोघांमध्ये जवळीक वाढली. याच ओळखीतून दोघांनी बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या कटाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी अंकुश चव्हाण आणि श्रवण चव्हाण या आणखी दोघांना सोबत घेतले.
रचलेल्या कटानुसार चौघांनी जळगाव तालुक्यातील भोकर गावातील स्टेट बँकेच्या शाखेला लक्ष्य केले. बँकेत मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दरोड्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रविवारी (1 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास चौघेही बँकेत दाखल झाले. हातात शस्त्रे असल्याने बँकेतील कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला. त्यानंतर गोळीबार करत दहशत निर्माण केली आणि बँकेतील सोने व रोकड ताब्यात घेतली. अवघ्या काही वेळात त्यांनी सुमारे 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला.
महत्त्वाची बाब म्हणजे, दरोडेखोरांच्या या कारवाईदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे घटनेची माहिती तातडीने बाहेर पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनीही आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केल्याने आरोपींच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. दरोड्यानंतर आरोपी गावाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने यातील एक आरोपी विदगावजवळ आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याच्याकडील रोकड आणि बॅगाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी पाठलाग करून उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेतले. अशा प्रकारे बँकेतून लुटलेल्या सोने आणि रोकडसह चारही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत चारही आरोपींना मुद्देमालासह अटक केली. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असून, त्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या दरोड्याचे नियोजन नेमके कसे करण्यात आले, आरोपींना बँकेतील सोने आणि रोकडची माहिती कशी मिळाली, तसेच या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.