नागाव : सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती करून नाव लावण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नागाव (ता. हातकणंगले) येथे ही कारवाई केली.
याप्रकरणी अवधूत रामचंद्र लोंढे (खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय) आणि सूरज कुंतिनाथ सोळांकुरे (खासगी व्यक्ती, रा. शिवाजी चौक, नागाव) या दोघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तक्रारदाराची वडिलार्जित जमीन मौजे नागाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे आहे. या जमिनीच्या गटात चुकीचे क्षेत्र नोंदवले गेल्याने ते दुरुस्त करून सातबारावर योग्य क्षेत्र नोंदवावे, यासाठी तक्रारदारांनी तहसील कार्यालय हातकणंगले येथे अर्ज केला होता. हे प्रकरण पुढील कामासाठी तलाठी कार्यालय नागाव येथे आले होते.
तक्रारदारांनी सातबारा उताऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी कागदपत्रे देऊन तलाठी यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी खासगी उमेदवार अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, रा. नागाव, ता. हातकणंगले) यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार अवधूत लोंढे यांना भेटले. त्यांनी सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याला कंटाळून तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. तक्रारदारांच्या अर्जाच्या पडताळणीदरम्यान खासगी उमेदवार अवधूत लोंढे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसरा आरोपी असलेला सूरज कुंतिनाथ सोळांकुरे (४२, रा. शिवाजी चौक, नागाव) यानेही तलाठींचे काम मी पूर्ण करून देतो, त्याकरिता तडजोडीअंती १२ हजार रुपये द्यावे लागतील' असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपी सूरज कुंतिनाथ सोळांकुरे याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.