मुंबई : महाराष्ट्रात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, लोकप्रिय योजनांचा गाजावाजा आणि 'लाडकी बहीण' सारख्या लोकानुनयी योजनांवर वर्षाला 45 हजार कोटी उधळले जात असताना दुसरीकडे राज्यातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी राज्यातील महायुती सरकार अत्यंत क्रूर खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) ग्रामीण व शहरी भागात वरदान ठरलेल्या महा लॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा निधीअभावी आर्थिक संकटाच्या खाईत सापडली आहे.
गेल्या 2 वर्षांपासून शासनाकडून 'एचएलएल लाईफ केअर लिमिटेड' या कंपनीची तब्बल 1,067.27 कोटी रुपयांची देयके सप्टेंबर 2026 पर्यंत प्रलंबित ठेवली आहेत. परिणामी, 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनेक भागांत महा लॅब, आपला दवाखाना आणि डायलिसिस सेंटर्सच्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या असून, हजारो रुग्णांना मिळणाऱ्या मोफत आरोग्य सुविधांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
एकीकडे सरकार 1 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या 'आरोग्य संवाद यात्रे'च्या मंचावरुन आरोग्याचे गोडवे गात असताना दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये रक्ताचा थेंब तपासण्यासाठी किंवा डायलिसिस करण्यासाठी गरिबांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. गरीब रुग्णांचे हाल सुरू असताना, राज्य सरकारची प्राथमिकता नेमकी कशात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लाभासाठी खजिना उधळायचा, पण आरोग्यासारख्या मूलभूत, अतिमहत्त्वाच्या प्राथमिक गरजेसाठी मात्र निधी द्यायचा नाही, हा राज्यकर्त्यांचा कारभार अत्यंत लाजिरवाणा आहे. कारण प्रश्न केवळ एका एचएलएल कंपनीच्या थकबाकीचा नाही, तर उपचारासाठी सरकारी दवाखान्यांवर अवलंबून असलेल्या लाखो सर्वसामान्यांच्या आरोग्याचा आहे. 'एनएचएम' अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने 'एचएलएल लाईफ केअर लिमिटेड' सोबत केलेल्या 10 वर्षांच्या करारानुसार गेल्या 7 वर्षांपासून या कंपनीमार्फत सुमारे 400 महा लॅब, 225 आपला दवाखाने आणि 110 डायलिसिस केंद्रे चालविण्यात येत आहेत.
याद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिकांना सीबीसी, थायरॉईड, बायोकेमिस्ट्रीसारख्या मोफत चाचण्या मिळत होत्या. आपला दवाखानाच्या माध्यमातून उपचारत होत होते आणि डायलिसिस केंद्रांच्या माध्यमातून मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना दिलासा मिळत होता. मात्र, मागील 2 वर्षांपासून शासनाकडून देयके मिळत नसल्याने या सेवा चालवणे कठीण झाल्याचे कंपनीने ऑक्टोब 2026 महिन्यात प्रशासनाला पाठवलेल्या दोन पत्रांतून स्पष्ट केले केले होते. 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे, डायग्नोस्टिक किट्स आणि आवश्यक साहित्य खरेदी करणे अशक्य झाले आहे.
प्रशासनाने 14 ऑक्टोबर रोजी केवळ 29.39 कोटी रुपयांची देयके देत कंपनीची बोळवण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही. किमान 200 कोटी रुपयांची अंतरिम रक्कम द्यावी, अशी कंपनीची मागणी होती. महत्त्वा म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सेवा बंद करण्याचा इशारा कंपनीने आधीच दिला होता. मात्र सरकारकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सेवेचा भार खेचल्यानंतर कंपनीने आपली सेवा बंद केली.
संचालकांनी उत्तर देणे टाळले
'आपलं महानगर'ने राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक संजय काटकर यांच्याशी संपर्क करुन त्यांना या थकीत देयकांच्या समस्येबाबत विचारले असता, मी एका कार्यक्रमात असून लवकरच सविस्तर माहिती घेऊन बोलू असे काटकर यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींची दिवाळी अन् गरिब रुग्ण सरकारी अनास्थेचे बळी!
सरकार कोणाचेही असो, सत्तेतील नेते बदलले तरी सामान्य रुग्णांचा आजार आणि उपचारांची गरज बदलत नाही. निवडणुका, योजना आणि राजकीय प्रसिद्धी यापेक्षा नागरिकांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का? सरकारी तिजोरीतील पैशांचे प्राधान्यक्रम ठरवताना सर्वसामान्य रुग्णांचा क्रम नेमका कुठे आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. कारण सरकारने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवर आणि वितरणावर पाण्यासारखा पैसा वाहिला आहे, दुसरीकडे रुग्णांच्या उपचारासाठी फाईल्स लालफितीत अडकून बसल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा ढोंगी आव आणणार्या सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की, जर घरातील कर्त्या पुरुषाचे किंवा महिलेचे आरोग्यच धोक्यात आले, तर त्या कुटुंबाचे काय होईल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मतांच्या राजकारणापुढे गोरगरिबांचे प्राण महत्त्वाचे वाटत नाहीत का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या आर्थिक तरतूद असलेल्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळानेही राज्याच्या आर्थिक नियोजनाबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे. महिलांना आर्थिक मदत देणार्या योजना महत्त्वाच्या असल्या, तरी त्याचवेळी रुग्णांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळणेही तितकेच आवश्यक आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक कल्याणाचा विचार करताना आरोग्यसेवेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये. लोकप्रिय योजनांसाठी निधीचे नियोजन होत असेल, तर रुग्णांच्या जीवाशी संबंधित सेवांसाठी आर्थिक तरतूद का वेळेत होत नाही, याचा राज्य सरकारने खुलासा करायला हवा.
आरोग्य संवाद यात्रा केवळ दिखावा
विशेष म्हणजे, राज्यभरात 1 नोव्हेंबरपासून 'आरोग्य संवाद यात्रा' काढली जात आहे. एकीकडे कागदावर आरोग्याचे गोडवे गायले जात आहे आणि दुसरीकडे प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांमधील मोफत सुविधा आर्थिक टांचाईमुळे बंद पडत आहेत, हा निव्वळ उपरोधिक थट्टा करणारा विरोधाभास आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केवळ फोटोसेशन आणि दौरे करण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून या थकबाकीचा हिशोब घ्यावा आणि सर्वसामान्य रुग्णांचे हाल थांबवावेत.
बच्चू कडू, खासदार बळवंत वानखेडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून महा लॅब आणि आपला दवाखाना सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
किडनी विकाराच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ
सर्वात संतापजनक बाब म्हणजे किडनीच्या आजाराने ग्रासलेल्या डायलिसिसच्या रुग्णांना आठवड्यातून अनेकदा उपचाराची गरज असते. ही सेवा खंडित झाल्यामुळे रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांचे अवाजवी शुल्क भरण्याची कुवत नसलेला गरीब बिचारा रुग्ण कुठे जाणार? महा लॅब बंद झाल्यामुळे साध्या रक्ततपासणीसाठीही आता नागरिकांना खासगी लॅबमध्ये लुटले जाते.
नेमकी किती कोटींची थकबाकी
'एचएलएल लाईफ केअर लिमिटेड' कंपनीच्या दाव्यानुसार, प्रयोगशाळा निदान सेवांचे 877.15 कोटी रुपये (सप्टेंबर 2026 पर्यंत), मोफत डायलिसिस सेवांचे 126.27 कोटी रुपये (सप्टेंबर 2026 पर्यंत) आणि आपला दवाखाना प्रकल्पाचे 63.83 कोटी रुपये (जून 2026 पर्यंत) अशी एकूण 1,067.25 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कंपनीच्या पत्रात एकूण रक्कम 1,067.27 कोटी रुपये नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 14 ऑक्टोबर 2026 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सेवांसाठी 29.39 कोटी रुपयांचे अंशतः देयके देण्यात आली असली, तरी प्रयोगशाळा, डायलिसिस आणि आपला दवाखाना या उर्वरित सेवांचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे कंपनीच्या म्हणण्यावरून स्पष्ट होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.