ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत. सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयातून योग्य उपचार मिळणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष जनतेला आरोग्यसेवा मिळते की नाही, याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हे निर्देश दिले. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेला हा दौरा हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयातील निकृष्ट बांधकाम आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे चर्चेचा विषय ठरला. यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर उपस्थित होते.
शेतशिवारात जाऊन पीक नुकसानीची पाहणी
दौऱ्याच्या प्रारंभी दरेगाव तांडा आणि वाळकेवाडी येथील शेतशिवारात भेट देत आरोग्यमंत्र्यांनी अतिवृष्टी व नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या 'आनंदाचा शिधा' किटचे दुष्काळग्रस्तांना वितरण करण्यात आले.
वाळकेवाडी येथील आत्महत्या केलेले शेतकरी राजू ढाले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबाला मदतीचा हात दिला. याच दौऱ्यात बिरसा मुंडा स्मारक सभागृहाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
ग्रामीण रुग्णालयात निकृष्ट बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर!
हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान मात्र वेगळेच चित्र समोर आले. रुग्णालयाची इमारत, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि रुग्णसेवेची माहिती घेत असताना उपस्थित नागरिक, रुग्णांचे नातेवाईक यांनी थेट आरोग्यमंत्र्यांसमोरच समस्यांचा पाढा वाचला. इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी, अपुऱ्या आरोग्य सुविधा, आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आणि उपचारासाठी येणाऱ्या अडचणी याकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.शासकीय निधीतून रुग्णालयाची इमारत उभी राहिली म्हणजे आरोग्यसेवेचे उद्दिष्ट पूर्ण झाले, असे नाही. इमारतीसोबतच आवश्यक उपकरणे, पुरेसे मनुष्यबळ, स्वच्छता आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. आता आरोग्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर बांधकामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी होणार का, संबंधित जबाबदार यंत्रणेवर कारवाई होणार का आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हारतुरे नाकारले; आरामदायी खुर्चीही हटवण्याच्या सूचना!
या दौऱ्यातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी स्वीकारलेली साधेपणाची भूमिका. तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी हारतुरे व सत्काराची तयारी करण्यात आली होती. मात्र, दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त असताना स्वागत-सत्कार स्वीकारणे उचित नसल्याचे सांगत त्यांनी हारतुरे स्वीकारणे टाळले. एवढेच नव्हे, तर कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आलेली आरामदायी खुर्चीदेखील काढण्यास सांगितल्याचे पाहायला मिळाले.
दुष्काळग्रस्त परिस्थितीत औपचारिक स्वागतापेक्षा जनतेच्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांच्या या कृतीतून दिसून आला. 'आनंदाचा शिधा' ही शासनाकडून मिळणारी मदत असून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून ती स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाची मदतही लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
दौऱ्यानंतर प्रश्न कायम; आता प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रतीक्षा!
एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील त्रुटींचा थेट सामना, असे या दौऱ्याचे चित्र राहिले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारी यांचे आता प्रशासकीय पातळीवर कितपत रूपांतर होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयातील बांधकामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई करणे, आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील याची खात्री करणे, या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कारण दौरे, पाहण्या आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष बदल जनतेला अनुभवायला मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. या दौऱ्यावेळी आरोग्य विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.