जळगाव : राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार अधिकाऱ्यांना देत असते. मात्र टेबलाखाळून मिळणारे पैसे, बिल पास करण्यासाठी मिळणारी टक्केवारी, यातून कोट्यावधींचे घबाड जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांनी जमा केली आहे.
सतीश शिसोदे यांना दहा हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना एसीबीने रंगेहात पकडलं. याच प्रकरणी तपास केला असता एसीबीला सतीश शिसोदे यांनी भ्रष्टाचारातून मोठी माया कमावल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. या कारवाईनंतर त्यांच्या घराची आणि बँकेतील लॉकरची झडती घेतली असता तब्बल पाच कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. यामध्य लाखोंची रोख रक्कम, दोन घरे, कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि प्लॉटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सतीश शिसोदेंना पोलीस कोठडी
सतीश मन्सुलाल शिसोदे (वय ५५) हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई केली होती. यावेळी सहकारी अभियंत्यासह १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्याकलम ७ आणि १२ अन्वर्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शिसोदे यांना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घराच्या झाडाझडतीत काय-काय सापडलं?
पथकाने शिसोदे यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत ७ लाख ९७ हजार ९२० रुपर्य रोख रक्कम आढळून आली. याशिवाय आदर्शनगर परिसरातील त्यांच्या मालकीच्या दोन घरांची माहिती समोर आली. पहिल्या घराची किंमत ४५ लाख रुपये, तर दुसऱ्या घराची किंमत ६५ लाख रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर मौल्यवान वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ रुपये आहे. अशाप्रकारे केवळ घर झडतीत १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मु्द्देमाल आढळून आला.
बँकेच्या लॉकरमध्ये घबाड सापडलं
शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आढळून आले. यामध्ये २५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चैन, पेंडल, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे. या सोन्याची किंमत ३ कोटी ५१ लाख९ हजार १५३ रुपये इतकी आहे. तसेच लॉकरमध्ये ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले. यामध्ये चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंचा समावेश असून, त्यांची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहेत.
याशिवाय १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळून आले. त्यांची किंमत ३ लाख ५५ हजार २८६ रुपये आहे. बँक लॉकरमधील या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये इतकी आहे. घर झडती आणि बँक लॉकरच्या तपासणीत मिळालेला सर्व मु्द्देमाल एकत्रित केल्यानंतर त्याची किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये इतकी झाली आहे. अवघ्या दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये कोट्यावधींची मालमत्ता आढळल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या मालमत्तेच्या स्रोताबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.