मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद विकोपाला गेले असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्या अपरोक्ष पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पक्षाच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली.
यातून पक्षात पवार आई – लेक विरुद्ध सर्व नेते अशी उघडउघड विभागणी झालेली बघायला मिळत आहे. पक्षाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र काम करण्याचा सल्ला शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार व त्यांचे खासदार पुत्र पार्थ पवार यांची अनुपस्थिती हाच चर्चेचा विषय होता. प्रफुल्ल पटेल यांनी शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती व तशी त्यांना भेट मिळाली. पवार आई – लेकाच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाल्यावर नेतृत्वाला या भेटीची कल्पना होती, अशी सारवासारव पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
या भेटीत पक्षांतर्गत वाद, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची कार्यपद्धती, राज्यात पक्षाची होत असलेली पिछेहाट यावरून नेतेमंडळींनी अमीत शहा यांचे लक्ष वेधले. त्यावर राष्ट्रवादीतील भांडणाचा महायुती सरकारवर परिणाम होत असल्याचे शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितल्याचे समजते. गेल्या महिन्यात पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. ती भेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वगळून झाली होती. त्या भेटीमुळे पक्ष नेतृत्व आणि पहिल्या फळीतील नेत्यांच्या संबंधाविषयी चर्चा सुरू झाली होती. पार्थ पवार यांचे पक्षात प्रस्थ वाढले आहे. पक्षातील बुजुर्गांची त्याविषयी नाराजी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षनेतृत्वावर नाराज होते.
हे तिघे मंत्री पदासाठी इच्छुक:
भाजपकडे असलेले अर्थ खाते पुन्हा पक्षाला मिळावे, मंत्रीमंडळ विस्तार करावा आणि भाजपबरोबरच्या सबंधात सुधारणा व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. या मंत्रिपदासाठी दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ इच्छूक आहेत. या भेटीच्या वेळी हे तिघेही उपस्थित होते. समीर भुजबळ यांच्यासाठी छगन भुजबळ आग्रही आहेत. अर्थ खाते, दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण यावरही चर्चा झाल्याचे समजते.
पक्षाच्या कामकाजावर चर्चा :
सोमवारी रात्री पक्षाच्या गाभा समितीची बैठक सुरेंद्र पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी पार पडली. यात पक्षाच्या कामकाजावर चर्चा झाली. राज्यातील दुष्काळी परस्थिती, पक्षातील नव्या निवडी आणि पक्ष संघटनेसमोरील आव्हाने हे विषय आजच्या बैठकीत होते. पक्षात नाराजी नाही. आजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या भूमिकेवर दोन्ही बाजूंनी पूर्वीच पडदा टाकलेला आहे. त्यामुळे आज विलीनीकरणावर चर्चा होण्याचा प्रश्नच नव्हता, असे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.