छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे विना पीयूसी, विना इन्शुरन्स रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या दुचाकी आता परिवहन विभागाच्या रडारवर आल्या आहेत. एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची मोहीम राबविल्यानंतर जुन्या वाहनांची माहिती अद्ययावत झाली.
आता अशा वाहनधारकांच्या मोबाइलवर गेल्या काही दिवसांपासून विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसीसी) नूतनीकरणाबाबत केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (एमओआरटीएच) नावाने संदेश येत आहेत. विमा आणि पीयूसीसी दीर्घकाळ नूतनीकरण न केलेल्या वाहनांची नोंद ‘कायमस्वरूपी अभिलेखागारात’ (परमनंट आर्काइव्ह) हलविल्याचे या संदेशांत म्हटले आहे.
राज्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक करण्यात आले. कारवाईच्या शक्यतेने जुन्या वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी गर्दी केली. या प्रक्रियेत वाहनांची माहिती अद्ययावत झाली. आता वाहनांच्या विमा आणि पीयूसीसीची वैधता हा मुद्दाही रडारवर आहे. त्यामुळे केवळ नंबर प्लेट बदलून जबाबदारी संपत नाही, तर वाहनाची कागदपत्रेही अद्ययावत असणे आवश्यक आहे.
मोबाइलवर इशारा वाहनधारकांना आलेल्या संदेशात विमा आणि पीयूसीसी दीर्घकाळ नूतनीकरण न केल्यामुळे संबंधित वाहनाची नोंद कायमस्वरूपी अभिलेखागारात हलविल्याचे नमूद आहे. वैध विमा आणि पीयूसीसीशिवाय वाहन चालविणे मोटार वाहन कायद्यानुसार कायद्याचे उल्लंघन असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पीयूसी, ‘इन्शुरन्स’साठी धाव ‘कायमस्वरूपी अभिलेखागारात’ नोंद गेली म्हणजे वाहन भंगारात गेले किंवा मालकी संपली, असा अर्थ नाही. वाहनाची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये संग्रहित श्रेणीत हलविण्यात आल्याचे यातून सूचित होते. मोबाइलवर असे मेसेज येताच दुचाकीधारक पीयूसी आणि इन्शुरन्स काढण्यासाठी धाव घेत आहेत.
‘चलता है...’, हे आता नाही चालणार नवीन दुचाकी घेतली की, तिचा विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) यांची काळजी नियमितपणे घ्यावी लागते. परंतु एकदा वाहन घेतल्यानंतर ‘चलता है...’ असे म्हणत पुन्हा या कागदपत्रांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा अनेक वाहनधारकांचा समज असतो. मात्र, आता वाहनधारकांच्या मोबाइलवर धडकणाऱ्या संदेशांमुळे हा गैरसमज दूर होण्याची वेळ आली आहे. वाहनाचा विमा आणि पीयूसीसी नियमितपणे नूतनीकरण आवश्यक असल्याची जाणीव या संदेशांमधून दिली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.