खाद्यतेलांच्या किमती 30 रुपयांनी घटल्या, सर्वसामान्य लोकांना दिलासा; आयात वाढविली
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू केल्याने आता त्यांच्या किमतीत ३० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक, गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिनाभरापासून खाद्यतेलाच्या चढ्या किमतीमुळे लोक बेजार झाले होते. भारतात खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे खाद्यतेलांच्या किमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली होती. देशात खाद्यतेलापैकी ६० टक्के आयात करण्यात येते; तर ४० टक्के उत्पादन स्वदेशातच होते. खाद्यतेलाची आयात वाढविल्याने आता किमतीमध्ये घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांचे भाव चढे असताना त्याचे परिणाम भारतातही दिसत होते. गेल्या वर्षभरात खाद्यतेलांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. तातडीचे व दीर्घकालीन उपाय करून केंद्र सरकार या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
खाद्यतेलांच्या आयात शुल्कात प्रतिटन ८ हजार रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यात पामतेलाचाही समावेश आहे. या शुल्क कपातीची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली होती. त्यानुसार क्रूड सोयाबीन तेलाचे आयात शुल्क प्रतिटन २७४६ रुपयांनी, तर क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रतिटन ८३१५ रुपयांनी घटविण्यात आले आहे.या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमती सामान्य पातळीपर्यंत येण्यास मदत होईल.
अशा आहेत कमी झालेल्या किमती
शेंगदाणा तेल प्रतिकिलो १८० रुपयांवरून १५० रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो १७० रुपयांवरून १४० रुपये, तर सोयाबीन तेल प्रतिकिलो १६० रुपयांवरून १३० रुपये व पामतेल प्रतिकिलो १५५ रुपयांवरून १२५ रुपये झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.