राज्यात 21 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण, एकाही रुग्णांचं लसीकरण नाही
मुंबई, 27 जून: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना दुसरं संकट उभं ठाकलं आहे. आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं एक बळीही घेतला आहे. दरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात ज्या रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी एकाही रुग्णांनी कोरोना लस घेतलेली नाही आहे.
राज्यातल्या ज्या 21 रुग्णांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला. त्यापैकी एकाही रुग्णांचं लसीकरण झालेलं नाही. या रुग्णांमध्ये तीन रुग्ण 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे त्याचं लसीकरण योग्य नाही.
दोन दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. तसंच 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यानुसार आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारमधील सार्वजनिक आरोग्य विभाग, एपिडेमिओलॉजी सेलचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, आम्ही राज्यभर संक्रमित रुग्णांचा सातत्याने शोध घेत आहोत. मात्र प्राथमिक माहितीनुसार बहुतेकांनी लस घेतलेली नाही आहे.
राज्यात रत्नागिरीत पहिल्यांदा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला. त्यानंतर जळगाव, पालघर, सिंधुदुर्गमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले. शुक्रवारी 80 वर्षांच्या महिलेचा या व्हेरिएंटनं बळी घेतला. या महिलेला 1 जूनला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.