SBI बँकेला बुडालेले पैसे परत मिळाले; विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करुन 5824 कोटींची भरपाई
मद्यसम्राट विजय माल्ल्या याने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज बुडवून माल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यामुळे SBI बँकेला 9 हजार कोटींच्या रक्कमेवर पाणी सोडण्याची वेळ आली होती. मात्र, गेल्या काही काळात सक्तवसुली संचलनालयाने विजय माल्ल्याच्या देशातील आणि परदेशातील मालमत्ता जप्त केल्या होत्या. या मालमत्तांच्या लिलावातून मिळालेले 5,824.5 कोटी रुपये नुकतेच SBI बँकेला देण्यात आले. त्यामुळे बँकेला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांनाही परदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. या तिघांनी मिळून बँकांचे 22,585.83 कोटी रुपये बुडवले होते.
फक्त 40 टक्के नुकसानीची भरपाई
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची संपत्ती बँकाकडे हस्तांतरित केली असली तरी यामधून केवळ 40 टक्के नुकसानीचीच भरपाई झाली आहे. विजय माल्ल्याने एसबीआयकडून तब्बल 9000 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, त्या मोबदल्यात एसबीआयला केवळ 5,824.5 कोटी रुपयेच मिळाले आहेत.
माल्ल्याकडे वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत?
विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.