रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, शरद पवारांच्या दिल्ली बैठकीवर पडळकरांची टीका
सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीवरुन टीकास्त्र
मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला.
ओबीसी उपमुख्यमंत्री का नाही?
ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे. धोक्याने जे सरकार आलं त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, हे ओबीसी का समोर आले नाहीत? सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.
मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये मंत्री यादी काढली तर कोण जातीयवादी आहे हे लक्षात येईल. धनंजय मुंडे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांनी मागच्या वेळी आंदोलनं केली, हे सर्व ओबीसीचे नेते आहेत. मात्र विश्वासघाताने हे सरकार आलं तेव्हा पुतण्या अजित पवार का पुढे आला? असा सवाल पडळकरांनी केला.
बाळासाहेब थोरातांच्या कन्येला उत्तर
काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा, मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला शिकवू नका सुसंस्कृतपणा, असं म्हणत पडळकरांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं.
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. पडळकरांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.