पृथ्वीराज पाटील फौंडेशनचा उपक्रम येत्या 20-30 वर्षांत जग प्रचंड वेगाने बदलेल डाॅ. अच्युत गोडबोले तरूणांनी नव्या तंत्राकडे डोळे उघडे ठेवून बघावे.
सांगली दि. 20: येत्या 20-30 वर्षांत जग प्रचंड वेगाने बदललेले असेल आणि त्यात खूप लोकांच्या कामाच्या स्वरूपातही बदल झालेला असेल, तेव्हा विशेष करून तरूण पिढीने हा बदल स्विकारायला हवा. स्वतःचे कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनेलिटी वाढवावी लागेल. नवीन तंत्राकडे त्यांना डोळे उघडे ठेवून बघावे लागेल, असा सल्ला प्रसिध्द लेखक आणि आयटी तज्ञ डाॅ. अच्युत गोडबोले यांनी आॅनलाईन व्याख्यानात दिला.
पृथ्वीराज पाटील फौंडेशन, सांगली यांच्यावतीने ‘‘उद्याचे बदलणारे तंत्रज्ञान आणि आपण‘‘ या विषयावर डाॅ. गोडबोले यांचे आॅनलाईन व्याख्यान आज झाले त्यावेळी त्यांनी हे विचारमंथन केले. प्रारंभी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आजच्या परिस्थितीत जग वेगाने बदलत चालले आहे. त्यामुळे लोकांच्यामध्य,े तरूणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशातच कोरोनाच्या दोन लाटांची त्यात आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत काय करता येईल यासाठीच डाॅ. गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
यावेळी डाॅ. गोडबोले म्हणाले, येत्या काळात नाणी, नोटा, चेक, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड या गोष्टी इतिहासजमा झालेल्या दिसतील. तुमचा मोबाईलच या सगळ्या गोष्टी पुर्ण करेल. चीनमध्ये आज एकही नाणे आणि नोट वापरली जात नाही. सर्व व्यवहार आॅनलाईन केले जातात. 100 टक्के आर्थिक व्यवहार घरबसल्या करता येतात. बॅंकेचे लोन काढण्यासाठी घरात बसूनच अर्ज करता येतो आणि तिकडून बॅकेचा मॅनेजरही कागदपत्रे तपासून कर्ज मंजूर करू शकतो.
ते म्हणाले, आॅफिस हा प्रकारच संपेल, गर्दीतून घाईगडबडीने प्रवास करून, लोकल पकडून आॅफिसला जायची गरजच पडणार नाही. शाळा, काॅलेजमध्येही हीच अवस्था निर्माण होईल. कोर्सेसचे स्वरूप बदललेले असेल. त्यामुळे शिक्षकांनी आता स्वतःला अपडेट ठेवावे लागेल. विद्याथ्र्यांसाठी चागले व्हिडीओ तयार करावे लागतील आणि तेच खरे शिक्षण असेल. जे शिक्षक हा अमुलाग्र बदल स्विकारतील, त्यांचेच खरे दिवस येणार आहेत.
ते म्हणाले, शेती आणि उद्योग क्षेत्रातही अमुलाग्र बदल होत चालले आहेत. उद्योगामध्ये पुढच्या 10 वर्षात टिकणारे उत्पादन काढले पाहिजे. भविष्याचा विचार करूनच या कंपन्या उभा राहिल्या पाहिजेत. जुन्या काळातील अनेक कंपन्या परिस्थितीनुसार बदलल्या नाहीत, त्यामुळे त्या बंद पडल्या. भविष्यात स्वयंचलीत कार मोठ्या प्रमाणात येणार आहेत, एवढेच नव्हे तर फ्लाईंग कार येवू घातल्या आहेत. त्यामुळे ड्रायव्हरांचे करायचे काय? तरीही कामाचे स्वरूप बदलले, तर रोजगार टिकू शकतो. आजच चीनमधून एक बातमी आली आहे की, तेथे 28 तासात 10 मजली इमारत बांधून पूर्ण केली आहे. आज घराचा नुसता नकाशा बघून सजावट करणे शक्य झाले आहे. घराचा रंग रोबोट देवू लागला आहे.
ते म्हणाले, आताच्या काळात डेटा मायनिंग महत्वाचे ठरले आहे. त्याचा खोलवर अभ्यास हवा. सगळ्या गोष्टी अॅटोमॅटिक आणि सेन्सरवर आल्या आहेत. डेटा मायनिंगमध्ये विविध क्षेत्रातील प्रचंड माहिती मिळू शकते. सीसीटीव्हीवर पटकन चेहरे ओळखता येतात. त्याचा फायदा तपास करणा-या पोलीस यंत्रणेला होवू लागला आहे. गुन्हेगार कोठे, कसा पोहचला याची माहिती पोलीसांना मिळू लागली आहेे. आर्टिफिसीएल लॅग्वेजचा हा फायदा आहे. मायक्रोवेव्ह, वाॅशिंग मशिन, टिव्ही आता प्रोग्रमवर चालत आहेत. तुम्ही खोलीत येताय म्हटल्यानंतर आधीच एसी सेन्सरद्वारे सुरू होईल. रेफ्रिजरेटरमध्यल्या वस्तू संपत आल्यात हा संदेश कंपनीला पोहचेल आणि त्या वस्तू लगेचच पोहोचही होतील. यंत्रे आपला मेंटनन्स जवळ आलाय हे कंपनीला आपोआपच सांगेल आणि स्वतःला दुरूस्त करून घेईल. मेडीकलचे ज्ञान प्रोग्रममध्ये घातले तर डाॅक्टरलाही डायग्नोस करणे सोपे जाईल.
भारताचा एकही प्राॅडक्ट संपूर्ण जगात अजून गेलेला नाही. 1990 पासून रिसर्च करण्यावर खर्चच केला जात नाही. आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना काळात 100 कोटी लोकसंख्येला 5 किलो गव्हावर जगावे लागते, हे दुर्दैव आहे. तरूणांचे मानसिक आरोग्य बिघडू लागले आहे. कोरोनाचे लसीकरण 100 टक्के तातडीने व्हावे, याकरीता लसीकरण करण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला हवा. असेही ते म्हणाले.
यावेळी लोकांकडून आलेल्या प्रश्नांना डाॅ. गोडबोले यांनी उत्तरेही दिली. स्वागत व सुत्रसंचालन पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अजय देशमुख यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी प्राचार्य सतीश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.