Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, विद्याताई चव्हाण, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, फिल्मसिटी च्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, कामगार आयुक्त, महेंद्र कल्याणकर यांसह गृह विभागाचे व पोलीसदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वी च्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील दोषींवर कठोर कारवाई करावी ज्यायोगे सर्वावर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी असे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकामार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी. कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये जागरुकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे अशा सूचनाही त्यांनी कामगार आयुक्तांना दिल्या.

गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागाची एक स्वतंत्र समिती कायमस्वरूपी गठीत करण्याच्या सूचनाही गृह विभागास देण्यात आल्या. यावेळी गृह राज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई आणि गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी ही दडपशाहीला आळा घालण्यासाठी गृहविभागाने ठोस कार्यवाही करावी असे यावेळी सांगितले. पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गोरेगाव फिल्मसिटी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.

श्रीमती वर्मा यांनी फिल्मसिटी अंतर्गत सुरु असलेल्या चित्रीकरणासाठी राज्यशासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलती आणि केलेल्या उपाययोजना याबाबत सांगितले. यावेळी उपस्थित निर्माता, दिग्दर्शक यांनी या क्षेत्रात वाढलेली गुन्हेगारी व त्यांच्यावर वाढलेला दबाव आणि समस्या व त्यांच्या मागण्या गृहमंत्र्याकडे मांडल्या. या बैठकीला सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, मेघराज भोसले, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.