अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई
सातारा: 02 जुलै: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.
जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ईडीनं दिलेल्या माहितीनुसार कारखाना विकत घेणारी कंपनी गुरु कमोडिटीज मध्ये सुनेत्रा पवार यांच्या जय ॲग्रोटेक या कंपनीतून सुमारे 20 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवण्यात आलेलं होतं. तर अजित पवारांचे मामेभाऊ असलेले राजेंद्र घाडगे जरंडेश्वर विकत घेणाऱ्या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे एकाच वेळी अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना कारखाना कमी किंमतीत मिळवून तो आपल्याच नातेवाईकांच्या नावे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कारण त्यातली गुंतवणूक ही त्यांच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नावे असलेल्या जय ॲग्रोटेक या कंपनीतून करण्यात आली होती.
तसंच गुरु कमोडिटीजनं हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत.
दरम्यान ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 2010 मध्ये या कारखान्याचा लिलाव केला आणि गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
मात्र माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील यांनी या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं होतं. थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाला असला तरी या प्रकरणी गैरव्यवहार झाला आहे. अजित पवारांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताईंकडून करण्यात आला होता. शालिनीताई या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.