महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र
आग्रा 03 जुलै: एका विवाहित महिलेनं देशी बंदुकीतून स्वतःच्या छातीत गोळी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या नावानं एक नोट लिहिली आहे. ज्यामध्ये तिनं PM मोदींना घरगुती हिंचाचाराबाबत भावनिक साद घातली आहे. सासरच्या घरात महिला कशा सुरक्षित राहतील, याबाबत ठोस पावलं उचलावित, अशा आशयाचं पत्र लिहून विवाहितेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
मोना द्विवेदी असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून तिला दोन लहानं मुलं देखील आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील विद्यापुराम कॉलनीत राहणाऱ्या मोना यांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरात देशी बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली आहे. गोळी झाडल्याचा आवाज येताचं घरातील अन्य एक महिलेनं मोना यांच्या रुमकडे धाव घेतली. घरातील अन्य सदस्यांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा मोना रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
जखमी मोना द्विवेदी यांना घरातील सदस्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मोना यांना मृत घोषित केलं आहे. मृत मोना यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तीन पानांचं पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइल फोनवर पाठवून आत्महत्या केली आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून मृत मोना यांनी या पत्राच्या माध्यमातून घरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष्य वेधलं आहे.
आपल्या दीरांनी दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या केली असल्याचं तिनं आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. अंबुज आणि पकंज अशी संबंधित आरोपी दीरांची नावं असून ते स्थानिक सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचा काहीसा दबाव आहे. मोना यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पुढं म्हटलं की, 'आपण एका गरीब कुटुंबातील असल्यानं संबंधित दोन्ही दीरांनी मला अनेकदा मारहाण केली आहे. मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं. तर माझ्या वडिलांना दारुचं व्यसन आहे. त्यामुळे कुटुंबाचा कोणताही आधार नसल्यानं मी मागील कित्येक वर्षांपासून सासरच्या मंडळींचा त्रास सहन करत आहे. मागील काही वर्षांत त्यांनी मला अनेकदा मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे.'
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. दीर आणि भावजय यांच्यात घरगुती कारणातून भांडणं होत असल्याची माहिती समोर आली, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.