गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अचानक सोहेरसूतक आले असता काय केले पाहिजे..
गणेशोत्सव हा आनंदसोहळा आहे. अनेकांच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसांसाठी गणपतीचे पूजन केले जाते आणि ठरलेल्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनही केले जाते. परंतु सोहेरसुतकाचे प्रसंग सांगून ओढावत नाहीत. आजही आपण त्यासंबंधीत शास्त्र पाळतो आणि तेवढे दिवस देवपूजा टाळतो. परंतु आपणहून गणपती बाप्पाला आपल्या घरी बोलावले असताना, सोहेरसुतकाचा प्रसंग आला, तर विसर्जन कसे आणि कधी करावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत 'शास्त्र असे सांगते' या ग्रंथात पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सोहेरसुतक आले असता घरातील ब्रह्मचारी मूलाकडून अथवा आप्तमंडळींकडून उत्तरपूजा करून गणेशविसर्जन करावे. काही कुटुंबात गर्भिणी असताना गणपतीचे विसर्जन करत नाहीत. गर्भिणीधर्म व गणेशव्रत यांचा अर्थार्थी कोणताही संबंध नाही.
गर्भिणी प्रसूत होईपर्यंत गणपतीची मूर्ती कोणतेही उपचार व विधी न करता झाकून अडगळीत ठेवणे हे केवळ शास्त्रविरुद्ध नव्हे तर ते अज्ञानमूलक श्रद्धेतून फोफावलेले सांस्कृतिक विडंबन आहे. म्हणून घरात गर्भिणी असताना सर्व कुलधर्म कुलाचार यथास्थित नेहमीप्रमाणे व नेहमीच्या कालावधीत करणे युक्त ठरते. यास्तव प्रसूतीची वाट न पाहता ठरल्याप्रमाणे गणेशविसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.
शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पयात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजे तलाव, विहिरीत करू नये. अन्यथा त्या जलाशयातील तो जलाशय प्रदुषित तर होतेच पण त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाहण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी, पोळा, हरितालिका, पार्थिवशिवपूजा, जन्माष्टमी इ. व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात, घरातील बागेत किंवा तुळशीवृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

