आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहचला ऑर्थर रोड जेलमध्ये..
करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. आजपासून भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड तुरुंगात आपल्या लेकाला भेटण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी शाहरुख एकटाच आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोहोचला असून, त्याची एक छबी टिपण्यासाठी ऑर्थर रोड परिसरात प्रचंड गर्दी झाली. आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर आज (२१ ऑक्टोबर) अचानक अभिनेता शाहरुख खान ऑर्थर रोड तुरुंगात पोहोचला. शाहरुख खान आर्यनची भेट घेणार असून, आर्यनला अटक झाल्यानंतर बापलेकांची ही पहिलीच भेट असणार आहे. शाहरुख खानला आर्यनला भेटण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ दिला होता.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी आधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन अजूनही कोठडीत असून, त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. १९ दिवसांपासून आर्यन घरापासून दूर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.