मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीसाठीच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. यूपी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने शनिवारी सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर शनिवारी लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक केली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
आशिषची चौकशी करण्यासाठी, यूपी पोलिसांकडून कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांच्या या याचिकेवर आज म्हणजेच 11 ऑक्टोबर ला सुनावणी होणार आहे. याआधी शनिवारी रात्री उशीरा आशिष मिश्राची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि मध्यरात्रीनंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आशिषला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलीस आज आशिष मिश्रा टेनीला कोर्टात हजर करणार आहेत. यापूर्वी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
अजय कुमार मिश्रा माध्यमांपासून दूर
दुसरीकडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ‘टेनी’ रविवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात पोहोचले, पण त्यांनी माध्यमांपासून थोडं अंतरच ठेवलं. त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. याआधी अजय मिश्रा हे दरवेळी माध्यमांसमोर येत होते, आणि आपला मुलगा कसा निर्दोष आणि शेतकरी कसे दोषी हे वारंवार सांगत होते.
विरोधकांकडून गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विरोधी पक्षांनी लखीमपूर घटनेवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रविवारी वाराणसीच्या एका रॅलीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना तातडीने हटवण्याची मागणी केली. प्रियंका म्हणाल्या की, “आम्ही घाबरणारे लोक नाही, आम्ही महात्मा गांधींवर विश्वास ठेवणारे लोक आहेत”
लखीमपूर खीरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह 8 ठार
अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या हिंसाचार प्रकरणी अटक झाली आहे. त्याआधी आशिष मिश्राची 11 तासांच्या चौकशी झाली. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचं नाव आहे. ज्यात त्याने रैलीतील शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं होतं, यानंतर शेतकऱ्यांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना आणि एका चालकाला मारहाण केली ज्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हिंसाचारादरम्यान एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू गाडीने चिरडल्याने झाला की त्यांनंतर झालेल्या हिंसाचारात झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.