दलित आणि मुस्लिमांची नावे मतदार याद्यांतून गहाळ करण्यात आली आहेत..
मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कोरोनाच्या संकटामुळे रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकांचं बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच निवडणुकांच्या तोंंडावर राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्यांवरुन जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील बऱ्याच ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी यासंबंधित एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यावर देखील थेट आरोप केला आहे.
मुंब्राच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला आहे. माझ्या मतदार संघातील देखील 20 ते 40 हजार नावे वगळण्यात आली आहेत. नाव वगळताना ते मतदार स्थलांतरीत झाल्याचा शेरा देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात ते लोक कोठेही स्थलांतरीत झाले नाहीत, तिथेच राहत आहेत. मग ही नावे बदलली कोणी?, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
तसेच गहाळ झालेल्या नावांसाठी जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. गहाळ झालेल्या नावांमध्ये प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची जास्त नावे आहेत. यामुळे मतदान ओळखपत्रासाठी आधारकार्ड अनिवार्य करावे, अशी देखील मागणी जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओतून केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.