महापरिनिर्वाण दिनानिमित्त जारी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 3, : ओमिक्रॉन या नविन विषाणूचा धोका पाहता दि. 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग होवून जनजीवन विस्कळीत होवू नये, आरोग्यविषयक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मागदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे. यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे. कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक दि. 4 जून 2021, सार्वजनकि आरोग्य विभाग आदेश दि. 11 ऑगस्ट 2021 व दि. 24 सप्टेंबर 2021 अन्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे. महापरिनिर्वाण दिन हा भारतीयासाठी दुखाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे, गांर्भीयाने वागणे आवश्यक आहे. तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जातील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच औष्णिक पटेक्षण (Thermal Screening) च्या तपासणीअंती त्यांचे शरिराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी परवानगी असणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही. दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालवधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.