वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार उद्दिष्टपूर्ती 31 मार्च पर्यंत करा - अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळण्यासाठी बँकांनी मेळावे आयोजित करावेत
सांगली दि. 16 : जिल्ह्याचा सर्व क्षेत्रासाठी वार्षिक पतपुरवठा आराखडा 8 हजार 41 कोटीचा असून त्यापैकी प्राथमिक क्षेत्राकरिता वार्षिक पतपुरवठा आराखडा 6 हजार 591 कोटीचा आहे. यापैकी सप्टेंबर 2021 अखेर 2 हजार 796 उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आली असून हे प्रमाण 63 टक्के आहे. उर्वरित 43 टक्के उद्दिष्ट 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या (बँकिंग क्षेत्र) बैठकीत सविस्तर आढावा घेताना दिल्या.
जिल्हा अग्रणी कार्यालय सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हास्तरीय आढावा समिती / जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी रिजर्व बँकेचे प्रतिनिधी तथा प्रबंधक नंदकुमार कोकरे, नाबार्डचे महाव्यवस्थापक श्री. धानोरकर, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक महेश हरणे, विविध बँकांचे समन्वयक तसेच महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सन 2021-22 साठी कृषि व तत्सम क्षेत्रास 4 हजार 659 कोटी इतके उद्दिष्ट असून सप्टेंबर 2021 अखेर 1 हजार 798 कोटीची पूर्तता झाली आहे. तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी 1 हजार 400 कोटी उद्दिष्ट असून सप्टेंबर 2021 अखेर 879 कोटीची पूर्तता झाली आहे. अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी 552 कोटी उद्दिष्ट असून सप्टेंबर 2021 अखेर 326 कोटीची पूर्तता झाली आहे. कृषी व तत्सम क्षेत्रासाठी बँकांनी पीक कर्ज देण्यावर प्राधान्याने भर द्यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात 5 लाख 52 हजार इतके नोंदणीकृत शेतकरी आहेत यांना किसान सन्मान योजना तसेच अन्य शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळावा यासाठी बँकांनी मेळाव्यांचे आयोजन करावे. तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती मेळावे आयोजित करावेत. बँकांकडे कर्ज मागणीसाठी येणारे अर्ज याचा तातडीने निपटारा करावा. तसेच रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. जिल्ह्याचा सीडी रेशो रेट 67 टक्के आहे. तो वाढविण्यासाठी सर्वच बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे या बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीत ज्या बँकांनी पतपुरवठ्यामध्ये उत्कृष्ट काम केले आहे अशांचे अभिनंदन करण्यात आले. तर ज्या बँकांची समाधानकारक उद्दिष्टपूर्ती झालेली नाही त्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी गतीने काम करावे. तसेच करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा अग्रणी बँकेस सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी महात्मा फुले मागास विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदि महामंडळांचा सविस्तर आढावा, प्रलंबित कर्ज प्रकरणे यांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर मुद्रा कर्ज योजना, कृषि विभागासंबंधित कर्ज योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.