कवठेमहांकाळ तालुक्यात सातबारा दुरूस्तीकामी शिबीराचे आयोजन - तहसिलदार बी. जे. गोरे
सांगली दि. 10 : कवठेमहांकाळ तालुक्यातील मोफत 7/12 वाटप केल्यानंतर खातेदारांकडून 7/12 मध्ये झालेल्या चुकाबाबत प्राप्त अर्ज नावनिहाय एकत्रित करून त्यावर निर्णय देवून 7/12 अचुक करण्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी तहसिल कार्यालय व संबंधित तलाठी कार्यालय येथे 7/12 दुरूस्ती करण्याबाबत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती कवठेमहांकाळ तहसिलदार बी. जे. गोरे यांनी दिली.
खातेदार / शेतकऱ्यांनी 7/12 चुकाबाबत संबंधित तलाठी कार्यालयास अर्ज करण्याचा कालावधी दि. 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत असून प्राप्त अर्जांची माहिती तहसिल कार्यालय येथे एकत्रीकरण करण्याचा दिनांक 21 फेब्रुवारी 2022 आहे. तसेच तहसिल कार्यालय येथे दि. 21 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधित खातेदारांनी दि. 20 फेब्रुवारी पर्यंत मोफत 7/12 वाटपानंतर त्यांच्या 7/12 उताऱ्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक पुराव्यासह अर्ज संबंधित तलाठी यांच्याकडे सादर करावा. 7/12 दुरूस्ती अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणीकृत 7/12 दुरूस्ती करण्यासाठी अर्ज करणे व त्याची जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरून खात्री करणे, तलाठी यांच्यामार्फत ऑनलाईन प्रस्ताव सादर करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये संगणकीकृत 7/12 उतारा अचूक करण्यासाठी शिबीराचे आयोजन ही विशेष मोहिम सुरू आहे. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह तहसिलदार बी. जे. गोरे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना सुचना केल्या असून या संधीचा शेतकरी, खातेदार, पक्षकार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कवठेमहांकाळ तालुका प्रशासनाच्या वतीने केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.