Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लढवय्या पत्रकार : प्रकाश कांबळे (बापू)

 लढवय्या पत्रकार : प्रकाश कांबळे (बापू)


सांगली जिल्ह्यात  गेली चार दशकं वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकार म्हणून आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं व्यक्तीमत्व म्हणजे प्रकाश कांबळे (बापू) ! होय...

     सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळी भागातील कोंगनोळी  या छोट्याशा गांवातील या  मुलाने कोणताही गॉडफादर नसताना स्वकतृत्वावर पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे.

    वडील रेल्वे सेवेत असल्याने अनेकदा बदलीच्या ठिकाणी रहावे लागायचे. बार्शी  (सोलापूर ) येथील शालेय शिक्षणानंतर हा मुलगा  सलगरे येथील हायस्कूलमध्ये  माध्यमिक शिक्षण घेऊन  पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये आला. सायन्स शाखेला प्रवेश घेतला...पण बारावीत ठेच लागल्याने पुन्हा   परिक्षेला बसावे लागणार होते.परंतू त्यामुळे  आता शांतिनिकेतनच्या वसतीगृहात राहता येणार नव्हते. त्यासाठी त्यांनी मिरजेला राहणे पसंत केले.त्यावेळी गावातील काही  मुले, तसेच नात्यातील चुलतभाऊ मिरजेत  भाड्याने खोली घेऊन शिक्षण घेत होते. त्यांच्याच खोलीत राहून बारावीचा विषय सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला.दरम्यान  या विषयांचा अभ्यास करतानाच मिरजेतील  बायसिंगर लायब्ररीमध्ये  अभ्यासाला येणे सुरू झाले.  बायसिंगर लायब्ररी 

 ही प्रकाश कांबळे यांच्या  आयुष्यात  'टर्निंग पॉइंट' ठरली. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके  असणारी ही लायब्ररी... शिवाय पुस्तके वाचण्यासाठी टेबल खुर्चीची उत्तम व्यवस्था ... साहजिकच प्रकाश कांबळे यांना वाचनाची गोडी लागली. काॅलेज संपल्यानंतर दिवसभर दुसरा उद्योग नसल्याने लायब्ररीत बसून पुस्तकाचे वाचन हा एककलमी कार्यक्रम सुरू असायचा   (येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा प्रकाश कांबळे यांच्याशी माझी तसेच  प्रा. भीमराव धुळूबुळू सरांची  भेट व्हायची.)   

दरम्यान बारावीची पुन्हा परिक्षा दिली.निकाल यायला अवधी होता.आता काय? हा प्रश्न पडला.गांवाकडे जाण्यापेक्षा छोटं मोठं काम करुन चार पैसे मिळवावेत हा विचार करून त्यांनी काम शोधायला सुरुवात केली. . मिरजेत नव्याने सुरू झालेल्या नेमगोंडा पाराज यांच्या  दैनिक "प्रतिध्वनी" या वृत्तपत्रात वार्ताहर पाहिजे अशी जाहिरात वाचून त्यानी  अर्ज केला.  संपादक अशोक मेहता यांनी वार्ताहर म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिली आणि तेथून म्हणजेच १९८३ पासून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली.  हळूहळू अनुभव घेत  ते   सांगलीत स्थिरावले.दै. "सांगली दर्शन, दै.प्रभात दर्शन, दै.केसरी या वृत्तपत्रात वातार्हर, उपसंपादक म्हणून काही वर्षे काम करण्याची संधी मिळाली. येथील प्रदिर्घ अनुभवानंतर राज्य पातळीवरील  दैनिक "सामना" सारख्या दर्जेदार वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेली २० वर्षाहून अधिक काळ ते काम करीत आहेत.पत्रकारितेत काम करताना प्रकाश कांबळे यानी आपल्या मनमोकळ्या नि हसतमुख स्वभावामुळे विविध क्षेत्रातील असंख्य असा मित्रपरिवारांशी एक अनोख्या नात्याचे ऋणानुबंध जोडले आहेत. प्रकाश कांबळे हे  पत्रकार असल्याचे बहुतांशी जणाना माहिती आहे. मात्र  एक उत्तम लेखक, कवी,  नाटककार, अभिनेते म्हणूनही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे उत्कृष्ट संघटन कौशल्य कला  त्यांच्या अंगी असल्याने अनेकदा त्याचा उपयोग झाला. अजातशत्रू असणारे प्रकाश कांबळे यांचा नवीन पिढीतील  अनेक पत्रकारांशी चांगले संबंध आहेत.प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभावामुळे सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे.  पत्रकार संघटनेच्या कामातही ते  सक्रीय असतात. त्यांच्या आजवरच्या पत्रकारितेतील कामाची दखल घेऊन  आद्य पत्रकार बाळशास्त्री  जांभेकर यांच्या नावाचा मानाचा "दर्पण" पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात  आले आहे.   जलयुक्त शिवाय अभियानाच्या उत्कृष्ट लिखाणाबद्दल महाराष्ट्र शासनाने  अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचा "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराही त्यांना मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून  दोन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर अत्यंत साधं, आणि विनम्र असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.पत्रकारितेतील नव्या- जुन्या पिढीशी आपुलकीचे ऋणानुबंध जपताना कुशल मार्गदर्शकाची भूमिका ते पार पाडत आहेत.

    कवठेमहांकाळ तालुका म्हटलं दुष्काळी भाग अशी या तालुक्याची ओळख होती.(गेल्या दहा वर्षात  म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने थोड्या फार बदलास सुरुवात झाली आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे)  त्यामुळे इथल्या माणसांचा लढावू स्वभाव पहायला मिळतो.  या परिसरातील माणसं  परिस्थितीशी लढत मोठ्या हिंमतीने, अविरत कष्ट आणि आत्मविश्वासाच्या  जोरावर समाजाच्या विविध क्षेत्रात अनेकांनी  यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.  

   प्रकाश कांबळे यांनी तर मोठ्या कष्टातून स्वताची पाऊलवाट निर्माण करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्विकारलेलं व्रत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.  पत्रकारिता, साहित्य   सामाजिक, कला, सांस्कृतिक अशा या आजवरच्या त्यांच्या वाटचालीत  आईवडीलांचे आशिर्वाद, पत्नी सौ.भारती कांबळे यांची मौलिक साथ लाभली आहे. आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले आहे.मुलगा प्रतिक, सूनबाई सौ.संकिता मुलगी  सौ.तेजस्विनी,जावई अभिजित जाधव,नातू तनिश यांचीही मनस्वी साथ लाभल्याने मी माझ्या आयुष्यात समाधानी असल्याची भावना ते व्यक्त करतात.

अशा  हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या प्रकाश कांबळे या  पत्रकार मित्राचा १६ एप्रिलला  वाढदिवस!

या  निमित्ताने प्रकाश कांबळे (बापू) याना  वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !  

भविष्यात त्यांच्या हातून  सामाजिक, साहित्य आणि पत्रकारिता आदि क्षेत्रात मोठं काम व्हावे या शुभेच्छा

नामदेव भोसले (पत्रकार) 9422410639

अध्यक्ष, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिरज


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.