सांगलीतील पोलिस मदत केंद्रे बनली कचऱा कुंडी पोलिस अधीक्षकांच्या कल्पकतेलाच अधिकाऱ्यांकडून हरताळ
सांगली : सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी लोकांपयर्त पोलिस पोहोचावेत यासाठी सांगली शहरात विविध ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभी केली आहेत. शहरातील अनेक ठिकाणी ही मदत केंद्रे झाल्याने नागरिकांची चांगलीच सोय झाली होती. त्यामुळे चोरी, मारामारीसह अनेक गुन्ह्यांना आळाही बसला होता. मात्र सध्या या पोलिस केंद्रांची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे.
बसस्थानक परिसरात असलेले पोलिस मदत केंद्र तर चक्क कचरा कुंडी बनल्याचे दिसत आहे. पुष्पराज चौकासह काही अपवाद वगळता ही पोलिस मदत केंद्रे नेहमीच बंद असल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकावर तसेच परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. असे असूनही या परिसरात असलेले मदत केंद्रच कचरा कुंडी बनली आहे. या केंद्रात रिकाम्या बाटल्या, कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. या परिसरात पोलिसांचा वावर असूनही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पोलिसांची मदत केंद्रेच जर अडगळीत गेली तर कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्याकडून कशी सांभाळली जाणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बसस्थानक परिसरात नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र यावेळीही पोलिसांना या मदत केंद्राकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला एक चांगला उपक्रम कचरा कुंडीत गेल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)