Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं

 कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं


नवी दिल्ली : देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. केरळमध्ये टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे.

वाढत्या रुग्णांमुळे लोक हैराण झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 82 मुलं टोमॅटो फिव्हरच्या विळख्यात सापडली आहेत. हा आजार होण्याचे मुख्य कारण काय आहे, याबद्दल अद्याप माहिती नाही. हा आजार पाच वर्षांखालील मुलांना होतो. सर्व 82 रुग्ण कोल्लम शहरात आढळले आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे हा आजार फक्त लहान मुलांनाच होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या सर्व आजारी मुलांवर केरळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचा आरोग्य विभाग या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे.

DNAIndia मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टोमॅटो फिव्हरला टोमॅटो फ्लू असेही म्हणतात. हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्याचा परिणाम 5 वर्षांखालील मुलांना होतो. बहुतेक बाधित मुलांमध्ये पुरळ उठणे, त्वचेवर जळजळ होणे, डिहायड्रेशन, त्वचेवर फोड येणे अशी लक्षणे दिसत आहेत. हा अज्ञात टोमॅटो फिव्हर हा व्हायरल ताप आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यू ताप आल्यानंतर दुष्परिणामांचा परिणाम आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या व्हायरल इन्फेक्शनला टोमॅटो फ्लूचे नाव मिळाले आहे कारण हे फोड सामान्यतः गोलाकार आणि लाल रंगाचे असतात.

टोमॅटो फिव्हरची लक्षणं

टोमॅटो फिव्हरच्या मुख्य लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे यांचा समावेश होतो. या संसर्गाने बाधित झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसून येतात. यासोबतच खूप ताप येणं, सांधे सुजणे, थकवा येणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसू शकतात. डिहायड्रेशनमुळे संक्रमित मुलाच्या तोंडात इर्रिटेशन जाणवू शकतं. तोंड कोरडे पडू शकते. हात, गुडघे यांचा रंग बदलणे हे देखील दुसरे लक्षण आहे. काहींना खूप तहानही लागू शकते. मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टोमॅटो फिव्हर टाळण्यासाठी टिप्स

* संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल.

* फोड किंवा पुरळांना स्पर्श करणे किंवा खाजवणे टाळा.

* पुरेशी स्वच्छता राखा, घर आणि मुलांभोवती स्वच्छता ठेवा.

* कोमट पाण्याने आंघोळ करावी.

* संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा.

* सकस आहार घ्या.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.