Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस

 राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस


मुंबई, 10 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अनेक मनसैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याच मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलं. या पत्राबाबत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांना सरकार विरोधी लढलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

तसेच भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? "राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटलं नव्हतं. जे सरकार लांगूल चालन करतंय.

ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे. राज्य सरकार विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पवारांना टोला लगावला. "शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल.

पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरेंना, त्यांना त्यांनी तो द्यावा", असा टोमणा फडणवीसांनी मारला. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत ऑफिस सुरू केलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पावरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

"महाराष्ट्रावर परिणाम मविआ सरकारमुळे होईल. मंत्री जेलमधून काम करताय. वर्क फ्रॉम जेल सुरूय. अनाचार सुरूय", अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रीज भूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे.

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्येला या, अशी आव्हान देत भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे. मनसेनं या मुद्यावर कुणालाही न बोलण्याची ताकीद दिली आहे. आता या प्रकरणाचा चेंडू देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पडला असून त्यांनी आपले स्पष्ट मतही नोंदवले आहे. 'राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रीज भूषण यांच्या विरोधाच कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत फडणवीस यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.