प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
नाशिक : अहमदनगर येथील एका कारखान्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संमती पत्र देण्यासाठी नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व क्षेत्र अधिकारी या दोघांनी प्रत्येकी १५ हजार रुपये असे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. नाशिकचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी, क्षेत्र अधिकारी कुशल मगन्नाथ औचरमल असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे नगर येथे गोल्ड ज्वेलर्स कौन्सिलिंग क्लस्टर संस्थेच्या हॉल मार्किंग सेंटरसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र पाहिजे होते. त्यासाठी लाचखोर दोघा अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
विभागाने पडताळणी केल्यानंतर रात्री नाशिक येथील उद्योग भवन मध्ये असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात दोघा अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.