वसईत दरड कोसळली 4 जणांची सुटका, दोन जण अजूनही दरडीखाली
स्थानिक पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. टेकाळेजवळ एमएमआरडीएच्या पाईपलाईनचं काम करण्यात आलं होतं. त्यानंतर कोणतीही संरक्षण भिंत बांधण्यात आली नव्हती. आज 13 जुलै रोजी 7 वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही दरड कोसळली.त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली.
वाहतुकीवर परिणाम
दरड कोसळल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. सकाळी 7 वाजता दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाला आणि स्थानिक यंत्रणाना कळवण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या.आतापर्यंत एकूण सहापैकी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर दोघे जण अजूनही दरडीखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
