Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात 6 ठार...

फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात 6 ठार...


छपरा : फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटा ने बिहार हादरले आहे. छपरा येथील एका इमारतीत ही दुर्घटना घडली असून यात सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच इमारतीच्या ढिगाराऱ्याखाली काही जण गाडले गेल्याची भिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केला जात आहे. दुर्घटनेतील जखमीं ना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फटाके बनवण्याचे काम बेकायदेशीररित्या सुरु होते. त्यामुळे याठिकाणी सुरक्षेचे अनेक नियम धाब्यावर बसवले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या बेकायदा कामाने निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला आहे. या मनुष्यहानीला जबाबदार कोण? संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

परिसरात पळापळ, प्रचंड घबराट आणि आक्रोश

अचानक झालेल्या भीषण स्फोटाने काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. स्फोटाचे तीव्र हादरे बसताच परिसरातील नागरिकांमध्येही प्रचंड घबराट पसरली. त्यामुळे लोकांनी जिकडे मोकळी जागा मिळेल, तिकडे पळायला सुरुवात केली. त्यामुळे दुर्घटना घडलेल्या परिसरात गोंधळ उडाला आणि मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोशही केला. ही घटना खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडाईबाग गावातील आहे. स्फोटामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव मोहीम राबवून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतीत बेकायदेशीर फटाका बनवण्याचा कारखाना सुरू

दुर्घटनाग्रस्त इमारतीत बेकायदेशीर फटाका बनवण्याचा कारखाना सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी येथे अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर नुकसान झालेल्या घरातून तीन ते चार एलपीजी सिलिंडर बाहेर काढून फेकण्यात आले. घरातून सिलिंडर फेकल्यानंतर लोक संतापाने धावू लागले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरदार तीव्रतेचा होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. स्फोटामुळे इमारतीत फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आणि इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

स्फोटाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल

सारणचे पोलीस अधीक्षक (एसपी) संतोष कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाची चौकशी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसोबत फॉरेन्सिक (एफएसएल) आणि तज्ज्ञांची टीम दाखल झाली आहे. स्फोटाच्या तपासात अनेक बेकायदेशीर बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फटाके कारखान्याच्या मालक मंडळींचे धाबे दणाणले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.