Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितिनभाऊ, तुम्ही राजकारणातही हवेत, सत्ताकारणातही हवेत!

 नितिनभाऊ, तुम्ही राजकारणातही हवेत, सत्ताकारणातही हवेत!


२३ मार्च  रोजी नागपुरात एक बहारदार सत्कार समारंभ झाला. नागपूर- विदर्भातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षांत पाऊल ठेवले म्हणून, हा सत्कार समारंभ होता. गिरीश गांधी हे नाव विदर्भात सर्वांना माहिती आहे.  ३०-३५ वर्षे ते सार्वजिनक जीवनात आहेत. समाजकारण, राजकारण, पर्यावरण यातील जे जे चांगले आहे, त्याचे ते पुरस्कर्ते आहेत. एवढेच नव्हे तर विदर्भाचे ते कायमचे ‘सांस्कृतिक मंत्री’ आहेत.  ‘वनराई’ या मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे विदर्भाचे ते प्रमुख आहेत. आजचे हिरवंगार नागपूर याचं बरेचसे श्रेय वनराईला आहे. मग गणपती टेकडी असो, सिताबर्डीची टेकडी असो.... ही सगळी हजारो झाडे गिरीशबाबू यांच्या नेतृत्त्वाखाली लावली गेली. वाढवली गेली. सत्तेत कधीही न राहता गिरीशबाबूंनी अनेक वनराई बंधारे बांधले. ‘जलसंधारण आणि पर्यावरण’ या विषयात जीव घालून काम करणारे जे थोडे नेते आहेत, त्यात गिरीशबाबू आहेत.  

हिवरेबाजारचे पोपटराव पवार महाराष्ट्रात  जसे उशिरा प्रसिद्ध झाले. प्रसिद्धीसाठी काम न करता त्यांनी दुष्काळी भाग हिरवागार केला. पळसखेडच्या ना. धो. महानोरांनी वाहणारे ओढे आडवून मेअखेरपर्यंत पाणीसाठा केला आणि आपली शेती फुलवली. शिवाय त्या शेतीत आणि रानात कविता केल्या. यशवंतराव चव्हाण यांनी महानोर यांचा ‘वही’ हा कथासंग्रह वाचला. आणि या कष्टकऱ्याला महाराष्ट्र विधानपरिषदेची आमदारकी दिली. गिरीशबाबूंना शरद पवार यांनी अगदी चार महिन्यांकरिता का होईना, आमदार केले. टिळा लावण्यापुरतेच. पण, गिरीशबाबूंना त्याचा फरक पडला. वर्षांतील ३६५ दिवसांत किमान ३०० कार्यक्रम नागपूरात करून या कर्तबगार समाजसेवकाने हजारो माणसे जोडली. कितीजणांना मोठे केले. प्रकाशात आणले. प्रख्यात कवी सुधाकर गायधनी जागतिक किर्तीचे आहेत. पण नागपुरात त्यांचा पहिला सत्कार गिरीशबाबूंनी केला. यशवंत मनोहर असतील.... महेश एलकुंचवार असतील... जे जे सामाजिक जीवनात महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्यामागे गिरीशबाबू ठामपणे उभे आहेत. 

असे गिरीशबाबू ७५ व्या वर्षांत प्रवेशकर्ते झाले म्हणून, त्यांच्या मनाविरुद्ध या सत्कार समितीचे आयोजन झाले. नितीन गडकरी सत्कार समितीचे अध्यक्ष झाले. नागपुरातील हा राजकारणी पण उमद्या मनाचा नेता. असा माणूस होणे नाही. मंत्रीपद असो-नसो, मनाने मोकळा... समाजात जे जे चांगले आहे, त्याचा पुरस्कार करणारा... भाजापामध्ये काम करताना वाजपेयी परंपरेतील. भाजापाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेला. मनाने निर्मळ... अशा नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गिरीशबाबूंच्या सत्काराला काँग्रेसचे नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे स्वत: आले. त्यांच्याच हस्ते सत्कार झाला. त्यांच्याबाजूला होते दत्ता मेघे.... राष्ट्रवादीचे अरुण गुजराथी... या महाराष्ट्राची ही परंपरा आहे. पक्षाच्या सगळ्या भिंती ओलांडून चांगल्या कामाला, चांगल्या व्यक्तींचा सत्कार करताना या परंपरेने संकोच केला नाही. ही यशवंतरावांची परंपरा आहे. जात-धर्म- भेद गळून पडले पाहिजेत आणि सामाजिक जीवनात समानतेचा पुरस्कार करणाऱ्यांना शक्ती दिली पाहिजे. 

ही त्या मागची भावना आहे. त्यामुळे यशवंतरावांना प्रखर विरोध केलेले एस. एम. जोशी यांचा पंचाहत्तरीचा सत्कार यशवंतराव चव्हाण करतात. आयुष्यभर राजकीय विरोधात राहिलेल्या थोर नेते उद्धवराव पाटील यांचा सत्कार यशवंतराव करतात. त्या उद्धवराव पाटील यांचा पुतळा विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये उभा करतात.... अशा या निकोप परंपरेतील तो  महाराष्ट्र, आजच्या घाणेरड्या राजकारणात परवा नागपूरच्या सत्कारात पुन्हा एकदा ठळपणे समोर आला. सगळ्यांच्या भाषणाने कार्यक्रम एका उंचीवर गेला. माझे मानसपुत्र बाळ कुलकर्णी यांच्या खुमासदार सूत्रसंचलनामुळे कार्यक्रम सतत रंगत गेला. योगायोग असा की, २३ जुलै रोजीच बाळ कुलकर्णी या संपादक, पत्रकाराचा ६७ वा वाढदिवस. पण, चूक मोठी झाली की, तो उल्लेख करण्याचे त्या दिवशी कसे राहून गेले ते समजत नाही. त्याबद्दल बाळची क्षमाच मागितली पाहिजे. पुढच्या वर्षी हा दिवस लक्षात ठेवीन आणि त्याची भरपाई करेन. लोकमतमध्ये माझ्यासोबत बाळ २५ वर्षे सहकारी होता. 

गिरीशबाबू हा फार मोठा माणूस आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राचे विदर्भाचे प्रमुख, वनराईचे प्रमुख, मानव मंदिर संस्थेचे प्रमुख, मारवाडी फाउंडेशनचे प्रमुख, स्मिता-स्मृती (अभिनेत्री स्मिता पाटील) यांच्या नावाने सलग २९ वर्षे स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर वार्षिक अंक काढणारे संपादक.... एक सामाजिक कर्यकर्ते... सच्चे काँग्रेस कार्यकर्ते, अशा अनेक रुपाने गिरीशबाबूंना विदर्भ पाहात आहे. हा माणूस पश्चिम महाराष्ट्रात असता तर पत्रकारांनी यांना डोक्यावर घेतले असते. पण प्रसिद्धीसाठी त्यांचे काम नाही. असा हा आगळा वेगळा माणूस.... त्यांच्या पंचाहत्तर वर्षांवर जो गौरवग्रंथ निघणार आहे त्यामध्ये लेख लिहिण्याची स्पर्धा आहे.  साहित्य, कला, संस्कृती, नाटक, चित्रपट, समाजकारण या सगळ्या क्षेत्रातील दिग्गज माणसं स्वत:हून लेख पाठवत आहेत. न मागता अनेक लेख आले. िगरीशबाबूंच्या सत्काराला पाच न्यायाधीश उपस्थित होते. 

सामान्यपणे न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश सामाजिक कार्यक्रमांपासून अलिप्त असतात. पण िगरीशबाबूंवर सगळ्याच समाजघटकांचे मनापासून प्रेम आहे. अशी माणसं जोडणं सोपे नाही. संबंध टिकवणे त्याहून अवघड. कामातून जे बोलतात ते कायमस्वरूपी लक्षात राहते. सुरुवातीच्या जीवनात शिक्षक असलेले गिरीशबाबू.... आज लोकांना माहितीही नसेल... नितीन गडकरी आठवी ईयत्तेत असताना गिरीशबाबू हे त्यांचे शिक्षक होते. आजही ते नाते कायम आहे. गिरीशबाबू विचारांनी काँग्रेसवाले. नितीनभाऊ भाजापावाले. पण, एकमेकांचा आदर करताना, एकमेकांवर प्रेम करताना पक्षाच्या भिंतीआड येण्याचे काहीच कारण नसते.  अलिकडे निर्माण झालेला दुष्टावा  किंवा विरोधकांना शत्रू मानणे हे सगळे सत्तेचे राजकारण आहे. 

गिरीशबाबूंच्या सत्कारात सुरुवातीचेच भाषण करताना मी या विषयाला थोडासा स्पर्श केला की, ‘आम्हाला यशवंतरावांचा महाराष्ट्र हवा आहे....’ जात- धर्म- पक्ष या नावावर राजकारण न करता, समाजकारण निकोप राहिले पाहिजे, हाच विचार देशाला तारणार आहे. या सत्कार कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे, अरुण गुजराथी, गिरीशबाबू सगळ्यांचीच भाषणे छान झाली. खचाखच भरलेल्या सभागृहातील गिरीशबाबूंवर प्रेम करणारे नागपूरकर साक्षीला होते. सर्वात उत्तम भाषण झाले ते नितिन गडकरी यांचे. 

नितिन गडकरी हा राजकीय माणूस नाही. पक्षीय तर अजिबात नाहीत. हा विधायक माणूस आहे. विकासपुरुष आहे. राजकारण एका हद्दीपर्यंत करावं. समाजकारण जास्त करावं. विरोधकांना शत्रू न मानता, मित्र मानून काम करावे, या संस्काराचे गडकरी आहेत. महाराष्ट्रात मंत्री होते. विधान परिषदेत विरोधी पक्षेनेते होते. केंद्रात सगळ्यात प्रभावी मंत्री आहेत. भाजापाचे अध्यक्ष होते. त्यांना कसे दूर केले, हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली गिरीशबाबूंची सत्कार समिती स्थापन झाली. 

भाषणात त्यांनी एक प्रभावी मुद्दा मांडला. समाजकारण, राजकारण याची भेसळ होवून आज ‘सत्ताकारण’ प्रभावी ठरलेले आहे. अशा सत्ताकारणात किती दिवस राहावे, असा विचार त्यांनी बोलून दाखवला. आजची सत्तेची स्पर्धा किळसवाणी आहे. विरोधकांना संपवण्यासाठी योजले जाणारे उपाय हुकूमशाही देशातही न शोभणारे आहेत. इथली लोकशाही निवडणुकीपुरती आहे. विरोधक हतबल आहेत. बहुसंख्य वाहिन्यांवर एकाच विचाराचा प्रभाव आहे. वाहिन्यांचा टी. आर. पी. त्यामुळेच आहे. अशावेळी सुसंस्कृत, सभ्य समाजकारण करणाऱ्यांना या सत्ताकारणाचा उबग येणे, अगदी स्वाभाविक आहे. गडकरी यांनी त्याच हताश भावनेने ‘या सत्ताकारणात रहावे का?’ असा प्रश्न विचारला... पण, त्यांना हे सांगणे आहे की, नितीनभाऊ, ‘तुम्ही असा विचार मनात आणूच नका.... तुमच्यासारखे लोक जर बाजूला झाले तर, आजच्या राजकारणातील धटिंगणांना रान मोकळे मिळेल.... तुमच्यासारखे सुसंस्कृत, सभ्य राजकारणी भाजपामध्ये असलेच पाहिजेत.... तरच काही आशा आहे... तुम्ही वाजपेयी परंपरेतील आहात.’ ‘राजधर्म का पालन करो’, असे मोदींना वाजपेयींनी त्यावेळी खडसावून सांगितले होते. त्या वाजपेयींची परंपरा ही लोकशाही परंपरा आहे. तुम्ही त्याचे वाहक आहात. महाराष्ट्रात तरी पूर्वीचा जनसंघ आणि नंतरच्या भाजपामधील त्यावेळचे नेते रामभाऊ  म्हाळगी, तुम्ही, रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक, शामराव कापगते, बुलडाण्याचे वानखेडे, ना. स. फरांदे, उत्तमराव पाटील, वामनराव परब, हशू अडवाणी यांनी किती खस्ता खावून पक्ष वाढवला. याची मला पूर्ण कल्पना आहे. तो जनसंघ किंवा नंतरचा भाजापा आज राहिलेला नाही.

अशावेळी तर तुमची जास्त गरज आहे. त्यामुळे तुम्ही सत्कारसभेत जो विचार मांडलात तो विचार मनातून काढून टाका. तुमच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे. आजची देशातील वाहतुकीची सगळ्यात उत्तम व्यवस्था तुमच्या अथक प्रयत्नाने झालेली आहे. विकासकामात तुम्ही राजकारण कधी आणले नाहीत. कोणाला संपवण्याची भाषा केली नाहीत. सभ्य सुसंस्कृत राजकारण कसे करावे, याचे जे या महाराष्ट्रात आदर्श आहेत, त्यात तुम्ही आहात. राजकीय मतभेद असतील आणि आहेतही. पण, त्याच्या मर्यादा जाणणारे तुम्ही आहात. म्हणूनच मोकळेपणाने गिरीशबाबूंच्या सत्कारात तुम्ही बोलू शकता. हे नितळपण हाच खरा महाराष्ट्र आहे. सत्ता येईल आणि जाईल.... पदे येतील आणि जातील पण माणुसकीचे नातं सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी या देशाच्या अध:पतनाला सुरुवात होईल. अशावेळी ‘अरुणी’ होऊन राजकारणाचे गढूळ पाणी आडवण्यासाठी कदाचित देहाचा आडवा बांध घालावा लागेल. तरच ‘धोम्यऋषींना’ आपल्या शिष्याने देशाला उपयोगी काम केले, हे समाधान वाटेल. तुम्ही समाजकारणात रहा.... राजकारणात रहा... आणि सत्ताकारणातही रहा.... आणि गिरीशबाबूंना बरोबर ठेवा... अशा सगळ्या चांगल्या संस्काराचे नेतेच देशातील आजचे घाणेरडे वातावरण बदलू शकतील. गिरीशबाबूंच्या सत्कारातून हाच संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे. 

‘रामशास्त्री’ रामण्णा

“पूजा-अर्चा, कर्म-कांड यामध्ये वेळ घालवायचा असेल तर पेशवाईचे पंतप्रधानपद सोडून गंगाघाटावर जावून तपश्चर्या करा...”  अशा स्पष्ट शब्दांत माधवराव पेशवे यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे त्यावेळचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांची आठवण व्हावी, एवढ्या परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. रामण्णा यांनी रांची येथील भाषणात देशातील विविध वाहिन्यांना खडसावलेले आहे. 

या देशातील बहुसंख्य वाहिन्या समाजाच्या मुख्य प्रश्नापासून खूप दूर आहेत. धर्म-जातींत भांडणे लावण्याचे काम प्रभावीपणे कसे करता येईल, मुख्य प्रश्नावरून सामान्य माणसांचे लक्ष कसे उडवता येईल, यासाठी जणू शपथ घेवून या वाहिन्या काम करतात आिण आजच्या केंद्रीय राज्यकर्त्यांना या सगळ्या वाहिन्यांबद्दल कृतकृत्य वाटते आहे. या वाहिन्यांमधील अनेकजण धार्मिक उन्मादाच्या विचाराने भारावलेले आहेत. त्यातील काहीजणांना ‘पद्मश्री’मिळाली. ती कशाची बक्षीसी होती, हे देशाला कळते आहे. या सगळ्या एकतर्फी प्रचाराची सुरुवात रामंमंदिर, रथयात्रा, आता ज्ञाानव्यापी, असे विविध विषय धार्मिक उन्माद वाढवायला या देशात कारणीभूत ठरत आहेत. सर्व धर्म समभाव, लोकशाही, स्वातंत्र्य, समता ही सगळी मूल्ये पायदळी तुडवून न्यायालयांचा अिधक्षेप करेपर्यंत, या वाहिन्यांची मजल गेलेली आहे. अशा उन्मत्त वाहिन्यांवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यामूर्तीनी सणसणित कोरडे ओढलेले आहेत. अर्थात त्यामुळे फार मोठा फरक पडेल, अशी शक्यता अजिबात नाही. कारण सरकारमधील एका गटाला याच पद्धतीचा उन्माद, निवडणूक वातावरण तयार करण्याकरिता, हवा आहे. राजीव गांधी यांनी विज्ञाान- तंत्रज्ञानाची नवीन आयुधे या देशात आणून घराघरात हे विज्ञान-तंत्रज्ञाान पोहोचवले त्याचाच नेमका फायदा उठवून सामान्य माणसांमध्ये भ्रम पैदा करण्याचे काम अतिशय प्रभावीपणे यातील बहुसंख्य माध्यमे करीत आहेत. या वर्मावर नेमके बोट न्या. रामण्णा यांनी ठेवले आणि अशा प्रवृत्तीचा पंचनामा केला . 

न्यायमूर्ती सत्यव्रत सिन्हा यांच्या स्मृतिदिनाच्या व्याख्यानमालेत योगायोगाने मुख्य न्यायमूर्ती रामण्णा यांनी रांची येथे देशातील आजचे त्रिवार सत्य निर्भिडपणे मांडलेले आहे. मुख्य न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यावर देशातील व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारे काही न्यायमूर्ती आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही निरोप समारंभाच्या भाषणात महात्मा गांधींच्याच विचारांचा पाया कसा महत्त्वाचा आहे, हे सांगितले. पाच वर्षांपूर्वी ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी हे विचार मांडले नव्हते. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मांडले. तरीसुद्धा ते मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. कारण आजच्या राज्यकर्त्यांना गांधी-नेहरू ही नावेही चालत नाहीत. 

मुख्य न्यायमूर्ती रामण्णा यांनी प्रसार माध्यमांमध्ये ‘कुडमुडी’ न्यायालये हिरीरिने जी मते मांडतात त्यावर आक्षेप घेतलेला आहे. एवढेच नव्हे तर वृत्त वाहिन्या आणि समाज मांध्यमांना देशाची प्रगती, समृद्धी आणि शांततापूर्ण विकास घडवण्याचा भाग म्हणून तुम्ही किती काम करता? असा प्रश्नही विचारला आहे. त्याहीपेक्षा आजच्या लोकशाहीच्या या काळात मुख्य न्यामूर्तीनी जी भिती व्यक्त केली आहे, ती या सरकारला आणि त्यांच्या कारभाराला शोभा देणारी नाही. न्यायमूर्तीवर होणारे हल्ले वाढत आहेत. आणि ज्या गुन्हेगारांना न्यायमूर्ती गजाआड पाठवतात किंवा अन्य शिक्षा फर्मावतात ते न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर, त्यांना सुरक्षा मागण्याची वेळ आली आहे! सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची ही टिपण्णी आजच्या सामाजिक वातावरणातील असुरक्षितता ठळकपणे नोंदवणारी आहे. या पूर्वी या देशातील अनेक न्यायमूर्तीनी गुन्हेगारांना शिक्षा सुनावलेली आहे.

अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. पण त्यावेळी  राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले नसल्यामुळे निवृत्त झाल्यावर अशा न्यायमूर्तींना सुरक्षेची गरज कधीच वाटली नव्हती. आताच्या मुख्य न्यायमूर्तींना याची गरज वाटावी, याचाच अर्थ आजचे सामाजिक वातावरण, कयद्याला न जुमानणारे, पदांना न जुमानणारे सार्वजनिक धटिंगणपणाचे झालेले आहे आणि ही गोष्ट सरकारला भूषणावह नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी कडक ताशेरे ओढल्यानंतर काही फरक पडेल, असे कोणी मानत नाही. कारण आजची सडलेली व्यवस्था दुरूस्त होणे शक्य नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य पदावर राहून आपले मत ठामपणे मांडणारा न्यायमूर्ती या देशात आहे, हासुद्धा या देशातील लोकशाहीला संरक्षण देणाऱ्या रक्षकाची भूमिका घेत असलेला एक न्यायाधीश आहे, याचे समाधान आहे. म्हणून  ‘रामशास्त्री’ रामण्णा यांचे  मन:पूर्वक अभिनंदन.... आणि त्यांना अभिवादन.... 

                                                                    - मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.