Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच! आमदार शंकरराव गडाख..

 आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच! आमदार शंकरराव गडाख..


राजकारणात फार काही मिळवायचे ही अपेक्षा नव्हतीच. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला कॅबिनेट मंत्री बनवले. या काळात मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावता आली. त्यामुळे आता मंत्री पद गेले असले तरी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना आमदार शंकरराव गडाख काय भूमिका घेतात, याकडे जिह्याचे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर सोनईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हा निर्धार बोलून दाखवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख हे होते.

यशवंतराव गडाख म्हणाले, सत्ता असताना कार्यकर्ते बरोबर असतात; परंतु आज मंत्री पद जाऊनही मोठय़ा संख्येने आपण उपस्थित आहात, हीच संघटनेची ताकद आहे. सत्ता बदलाच्या धर्तीवर अनेकांनी भूमिका बदलल्या; परंतु शंकररावांनी दिलेला शब्द पाळून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत शब्द काय असतो हे दाखवून दिले. तालुक्यातील पहिल्यांदा मिळालेले कॅबिनेट मंत्री पद अडीच वर्षं तालुक्यातील विविध योजना, विकासकामे पूर्ण करण्यासाठी वापरले. राजकीय जीवनात अनेक संकटे आली; परंतु नेवासा तालुक्यात शंकररावांना देण्यात आलेला त्रास निषेधार्ह आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका मोठय़ा ताकदीने तुमच्या सर्वांच्या बळावर जिंकू, असेही ते म्हणाले.

शंकरराव गडाख म्हणाले, राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याचे मोठे दडपण होते. आत्तापर्यंतची वाटचाल खूप संघर्षातून गेली. तत्त्वांशी तडजोड केली नाही, म्हणून दोन निवडणुकांमध्ये पराभूत झालो; पण तरीही संघर्ष सुरू ठेवला. 2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी विश्वास दाखवला होता. त्यामुळे त्यांची ऐन वेळी साथ सोडली नाही. सरळमार्गी काम करणाऱया माणसाबरोबर राहण्याची भूमिका घेतली. यापुढील काळातही सत्ता असो वा नसो नेवासा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

… तर रक्ताचे पाट वाहिले असते

राज्यातच नव्हे देशात जरी उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती , तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते . मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतः कमीपणा घेऊन हे सगळे थांबवले . त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झाले , ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे , असेही आमदार शंकरराव गडाख म्हणाले .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.