Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा...

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा...


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवून आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मुकुट मिळाला आहे. आपला जुना मित्र असलेल्या भाजपला पर्याय देत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले होते.

मात्र शिंदे यांनी पक्षांतर्गत नाराजीच्या जोरावर महाविकास आघाडीलाच सुरुंग लावल्याने ठाकरेंना पायउतार व्हावे लागले. विधान परिषदेची निवडणूक उरकून अवघे काही तास उलटले नाही तोच सेनेचे नाराज आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरतला पोहोचले होते. जवळपास ११ दिवसांच्या या बंडाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. आजही महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ‘त्या’ रात्री नेमके काय घडले याबाबत कुतुहूल आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी अशा सर्वच प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. शिंदे यांनी अनेक खुलासे देखील केले आहेत. यातीलच एक म्हणजे शिंदे व बंडखोर आमदार ज्या रात्री सुरतला निघाले होते, तेव्हा त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बोलणे झाले होते का. एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करताना त्या रात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे झाले होते अशी माहिती दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सूरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "मी त्यांच्याशी बोललो आणि चाललो आहे असं सांगितलं. त्यांनी परत या म्हटलं. पण मी त्यांना परत येईन की नाही माहित नाही सांगितलं. कारण मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हाच विचार केला असता, निर्णय बदलला असता तर ही वेळ आली नसती". आम्ही पाच वेळा त्यांच्याकडे भूमिका मांडली. पण त्यात यश आलं नाही असंही त्यांनी सांगितलं.

"हा निर्णय मी फक्त माझ्या खच्चीकरणामुळे घेतलेला नाही. जे २५-३० आमदार होते त्यांना रोज येणारा अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न यामुळे पुन्हा निवडून येण्याची चिंता सतावत होती. कारण पडलेल्या उमेदवाराला घटक पक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या लोकांचं खच्चीकरण करु लागले. आमच्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करण्यात आलं. निर्दोष असतानाही मोक्कासाऱख्या कारवाईंना सामोरं जावं लागलं," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.