Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख आणि प्रा. अमर पांडे सरांना आलेला राग...

 डॉ. बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख आणि प्रा. अमर पांडे सरांना आलेला राग...


बरीच वर्षे झाली. सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात इतिहास परिषद होती. परिषदेचे कव्हरेज करण्यासाठी गेलो होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी परिसंवाद होता. स्टेजवर काही पुणेरी ‘संस्कारा’चे वक्ते त्यामध्ये सहभागी झाले होते. एक वक्ता बोलत होता. बोलण्यात त्याच्या ‘डॉ. आंबेडरकर’ असा वारंवार उल्लेख येत होता. सभागृह भरले होते. त्यात प्राध्यापक, विद्यार्थी होते. सर्वजण परिसंवाद ऐकण्यात गुंतले होते. अचानक पाठीमागून एक दमदार आवाज आला. ‘महाशय, जरा थांबा’ कोणाला काही कळले नाही. तर पाठीमागे एक सफारी ड्रेस परिधान केलेले एकजण जोरात बोलू लागले. 

बोलताना त्यांच्या आवाजात आणि चेहर्‍यावर संताप दिसत होता. ते बोलू वक्त्याला उद्देशून बोलू लागले, “डॉ. आंबेडकर, डॉ. आंबेडकर’ असे तुम्ही सारखे म्हणत आहात, डॉ. आंबेडकर हे तुमचे क्लासमेंट होते काय?’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणता येत नाही. दुसर्‍या समाजसेवकांची नावे मात्र तुम्ही आदराने घेताय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेच म्हणा”. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे वक्ते गोंधळून गेले. थोडा वेळ त्यांनी आपले भाषण थांबवले. त्या व्यक्तीच्या बोलण्याने सभागृहामध्ये वेगळे वातावरण तयार झाले होते. प्रसंग ओळखून अखरे पुणेरी वक्त्याने सरळ सभागृहाची माफी मागितली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला अनादर दाखवायचा नव्हता, तरी मी बोललो असेन तर मला माफ करावी, असे सरळ त्यांनी माफी मागून पुढचा परिसंवाद सुरू केला. 

ज्यांच्यामुळे आपण आज प्राध्यापक झालो आहोत, सुशिक्षीत होऊन आपण ताठ मानाने समाजात उभे आहोत. आणि जर त्यांच्या नावाबद्दल सुद्धा किंवा अनावधानेही अनादर दाखवत असेल तर आपली नोकरीवर काय परिणाम होईल, आपल्याला सर्वजण वाळीत टाकतील का?, याचा विचार न करता थेट त्याला त्याच क्षणी सुनावणारी धाडसी व्यक्ती कोण आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता माझ्या मनामध्ये निर्माण झाली. परिसंवाद संपल्यानंतर  त्यांची थेट भेट घेतली. मी पत्रकार आहे, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव सांगितले, ‘मी प्रा. अमर पांडे’.

बस पांडे सरांच्या या एका कृतीचा मी अक्षरश: फॅन झालो. पुढे त्यांच्याशी संवाद सुरू झाला. प्रत्येकवेळी कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी भेट व्हायची. पहिला ते माझे अभिनंदन करायचे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असल्याबद्दल त्यांना खूपच कौतुक होते. पुढे अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. त्यांच्याशी एकवेळची चर्चा म्हणजे आमचे बौद्धिकच असायचे. मराठवाडा नामांतरचा विषय निघायचा. पुढे त्यांची मुलगी पायल दिल्लीच्या एनएसडीमध्ये नियुक्त झाली. ते म्हणाले, गणेश आमच्या पायल एनएसडीमध्ये सिलेक्ट झाली आहे. तिच्याबद्दल लिहायचे आहे. तुम्ही आमच्या घरीच या. दुपारच्यावेळी त्यांच्या घरी गेलो. 

माहिती घेतली.  त्यानंतर त्यांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची पेपरची कात्रणे माझ्यासमोर ठेवली. त्यात त्यांचे संपूर्ण जीवनपट उलघडत गेला. त्यात मी अंनिसचे काम करतो, असे म्हटल्यानंतर त्यांनी आणखी एक कात्रण काढले. त्यात ते अंधश्रद्धेवर व्याख्यान देत होते. नामांतर लढ्यात वसंतदादा मुख्यमंत्री होते. त्यांची गाडी कशी अडवली. पोलिसांनी केलेला लाठी मार या सर्व गोष्टी ते सांगत गेले. त्यांचे ऐकत गेलो आणि आपण कार्यकर्ते समाजासाठी काहीच करीत नाही, याची जाणिव होत गेली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आंतरजातीय विवाहाबद्दल बोलले. त्यातून ते केवळ ‘बोलके’ सुधारक नव्हते, तर ते ‘कर्ते’ सुधारक असल्याची जाणिव झाली आणि आमचा संवाद पुढे घट्ट होत गेला. पुढे दैनिकात मुलगी पायलबद्दल मी छापले. 

पुढे कधी मी कुठे भेटलो, तर ते जवळ यायचे आणि ‘जय भीम’ असे बोलून सुरुवात करायचे. त्यावेळी समजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीमध्ये किती भिनले आहेत. केवळ भाषणबाजी करून कार्यकर्ते घडत नाहीत, तर एका वेळी एक कार्यकर्ता तयार करणे कसे असते, हे डॉ. पांडे सरांकडे पाहिल्यावर लक्षात आले. नाहीतर आम्ही केवळ भाषण देत असतो आणि स्वत: ला नेता समजू लागतो. आपल्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची तत्वे पायदळी तुडवली जातात. त्यांचा अपमान केला जातो, संविधानाची तत्वे पाळली जात नाही. बाबासाहेबांनाी सांगिलेली 22 प्रतिज्ञा तर आपल्याला माहीत सुद्धा नाहीत. 

एखाद्या लाचारासारखे आपण बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणार्‍यांच्या मागे धावत असतो. त्यामुळे अशा काळात बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करणार्‍याला सुद्धा जाब विचारणारे पांढे सर आता परत किती निर्माण होतील का? याबद्दल शंकाच आहे. कारण नामांतर चळवळ, दलित पँथरची पार्श्वभूमी लाभलेले पांडे सर होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोणतीही चळवळ नाही. बाबासाहेबांचे विचारांच्या विरोधात काम करणार्‍या संघटनेत आपले काम करीत आहेत. त्यांना यापुढे कधी बाबासाहेबांची चळवळ समजणार सुद्धा नाही. त्यावेळी पांडेसरांचे स्मरण हे महत्त्वाचे ठरणार आहे. असो, डॉ. प्रा. अमर पांडे यांना अखेरची सलामी....

गणेश कांबळे, पत्रकार


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.