लाच घेणाऱ्या त्या पाेलीस उपनिरीक्षकास ,न्यायालयाने सुनावली 5 वर्ष सक्तमजुरी शिक्षा.
सोलापूर : गंभीर गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकसर्जेराव सखाराम शिंदे ( वय ५४, रा. आदर्श नगर, किवळे, देहु रोड, पुणे ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी ५ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तक्रारदार व इतर ५ जणांवर सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास आरोपी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिंदे याच्याकडे होता. शिंदे याने तक्रारदारास जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली. २८ जुलै २०१७ रोजी तक्रारदाराकडून लाचेची २० हजार रुपये स्विकारली.
आरोपी शिंदे याच्यावर सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. अति. सरकारी वकील ए. जी. कुलकर्णी यांनी आरोपी लोकसेवक याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच स्विकारली, हे सरकार पक्षाने शाबीत केल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपी शिंदे याला ५ वर्षे सक्तमजुरी व ४ हजार दंड व दंड न भरल्यास २ महिने शिक्षा सुनावली. आरोपीच्या वतीने ॲड. पोफळीकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून ए. एस. आय. कोळी व घुगे यांनी काम पाहिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.