माझ्या विरोधात कारवाई केली, तर तो व्हिडीओ बाहेर काढेन; आमदार नितीन देशमुख
अकोला येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे देखील उपिस्थत होते. आमदार नितीन देशमुखांनी सुरत आणि गुवाहाटीमधील अनेक गुढ उकलण्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या ठिकाणचे अनेक व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.
नितीन देशमुख म्हणले आहेत की, पाच दिवसांपूर्वी माझ्यावर अँटी करप्शनची चौकशी लावण्यात आली. अँटी करप्शनच्या एसपींनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटण्याचं मला म्हटलं. आपल्या ईडीची चौकशी लावायला हवी, अँटी करप्शनची कशाला लावता. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल. माझी तुरूंगात जायची तयारी आहे. यांनी जर पुन्हा माझ्या विरोधात कारवाई केली, तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ क्लिप्स आहेत, ते उघड करेन. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजर खुपसला, सत्तांतर घडवलं त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन.
'50 खोके एकदम ओकेचं षडयंत्र दिड वर्षांपासून सुरू'
नितीन देशमुख पुढे म्हणले, महाराष्ट्रातील सत्तातराचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 50 खोके एकदम ओकेचं षडयंत्र दिड वर्षांपासून सुरू. ज्यांनी येथे निष्ठावंतांचा आव आणला होता, तेच 20 तारखेला सुरत येथे शिंदे गटात गेलेत. माझी वस्तूस्थिती पक्षाच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना माहित आहे. सुरतला जाणं वेगळं आणि नेलं जाणं वेगळं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणले, शिवसेनेला 'डुप्लीकेट सेना' म्हणणाऱ्या नारायण राणेंच्या डोक्यावरील केस डुप्लीकेट. सत्तर वर्ष वय असलेल्या राणेंना डोक्यावर डुप्लीकेट केस बसवावे लागतात. राणे तुम्ही मुंबईत फिरणं मुश्किल होईल म्हणता. तुमच्या आमदारांजवळ बॉडीगार्ड आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांजवळ बॉडीगार्ड नाही. मी मूंबईत येतो, तुम्ही फिरणं बंद करून दाखवा, असं आव्हान त्यांनी राणे यांना दिलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.