बेकायदा दारू अड्ड्यावर धाड, भट्टीवाल्याने पोलिसाला नदीत फेकलं
दारूच्या बेकायदा अड्ड्यावर धाड टाकायला गेलेल्य पोलिसाला भट्टीवाल्याने नदीत फेकल्याची घटना बिहारच्या मुजफ्फरपूर भागात घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूर येथे बेकायदेशीर दारूची भट्टी लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या अड्ड्यावर धाड टाकण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. सोमवारी रात्री मुजफ्फरपूरच्या साक्रा-मुसहरी परिसरातील या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या दोन पथकांनी परिसरातून सात आरोपींना अटक केली.
या पथकात असलेल्या दीपक कुमार (23) या पोलीस हवालदाराने पळून जाणाऱ्या दोन आरोपींचा पाठलाग केला. ते आरोपी तिथूनच वाहणाऱ्या बुऱ्ही गंडक नदीच्या तीरावर धावले. त्यांनी तिथे असलेल्या होडीत उडी मारली. त्यांचा पाठलाग करणाऱ्या दीपक यांनी त्यांना त्याही परिस्थितीत थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या या दोन आरोपींनी दीपक यांना पकडून खेचलं आणि नदीत फेकून दिलं. गंभीर म्हणजे दीपक यांचा बुडून मृत्यू होईपर्यंत ते दोघेही तिथेच थांबले होते. या दुर्घटनेची दखल पोलीस विभागाने घेतली असून या आरोपींचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
