९६ दिवसांनी महाराष्ट्रात इंधनाच्या किमती घटल्या
देशातील इंधनदर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. कारण, इंधनदरात घट झाल्याची माहिती देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे जवळपास ३ महिन्यांनंतर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ०.९४ डॉलरने खाली आले असून प्रति बॅरल ८४.९८ डॉलरवर आहे. तसेच, WTI ०.३५ डॉलरने घसरुन प्रति बॅरल ७९.१३ डॉलरवर आले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, मात्र ९६ दिवसांनंतर डिझेल २५ पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४४ पैशांनी आणि डिझेल ४१ पैशांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये इंधन महागले आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल किती घटले?
महाराष्ट्रात पेट्रोलचे दर ५७ पैशांनी कमी होऊन १०५.९६ रुपये प्रति लिटर झाले आहेत. राज्यात डिझेल ५४ पैशांनी घसरुन ९२.४९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर मध्य प्रदेशातही इंधन स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोल ३० पैशांनी स्वस्त झाले असून १०९.७० रुपये प्रति लिटर तर डिझेल २८ पैशांनी स्वस्त झाले असून ९४.८९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दरम्यान, दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपयांवर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर १०६.१७ रुपये असून, डिझेल ९२.६८ रुपयांवर आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७६ रुपयांवर असून, डिझेलचा भाव ९३.२६ रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल १०८.७५ रुपये असून, डिझेल ९५.४५ रुपये आहे. तसेच कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०६.५६ रुपये असून, डिझेल ९३.०९ रुपयांवर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
