Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पाटबंधारे' कडून क्यूआर कोडद्वारे पाणीपट्टी वसुली..

'पाटबंधारे' कडून क्यूआर कोडद्वारे पाणीपट्टी वसुली..


सांगली: पाटबंधारे विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने क्यूआर कोडद्वारे लाभधारक शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीचे काम हाती घेतले आहे. सिंचन कर्मचारी क्यूआर कोडद्वारे लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी जागेवरच वसूल करू शकतो. लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरणा झाल्याची पोहोच ऑनलाइन पाहता येणार आहे. पाणीपट्टी वसुलीत सुलभता व पारदर्शकता येणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या सर्व सिंचन कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहे. तरी कार्यक्षेत्रातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी याचा • फायदा घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून सिंचन व्यवस्थापनाचे काम प्रामुख्याने केले जाते. कोयनानगर येथील कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडून सिंचन तसेच बिगर सिंचनासाठी त्याचा वापर केला जातो. जलसंपदा विभागामार्फत पाणी नियोजनाच्या कामामुळे शासनाचे सुयोग्य पाणी व्यवस्थापनामुळे जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ३९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यामुळे परिसरातील जलस्त्रोतांचे पुनर्भरण करून भूगर्भजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे, त्यामुळे पिके चांगली येण्यास मदत झाली आहे.

सिंचन व्यवस्थापनामध्ये लाभधारक शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करून पाणीपट्टी वसुलीचे काम केले जाते. पाणीपट्टी वसुली करण्यासाठी सिंचन कर्मचारी हा मोठा दुवा आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून पारंपरिक पद्धतीने लाभधारक शेतकऱ्यांची सिंचन पाणीपट्टी वसुली सहकारी साखर कारखान्यामार्फत व प्रत्यक्ष रोखीने केली जाते. दिवसेंदिवस सिंचन कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सिंचन कर्मचारी संख्या कमी होत आहे. 

अशावेळी दुर्गम भागातील जत, संख, कुची या शाखा कार्यालयाकडील सिंचन कर्मचाऱ्यांना बँक शाखा जवळ उपलब्ध नसल्याने मिरज शहरात येऊन पाणीपट्टीचा भरणा करावा लागत आहे. रोखीने जमा होणारी पाणीपट्टीची रक्कम हताळणे, त्याची वाहतूक करणे जोखमीचे आहे. पाणीपट्टीची रक्कम शाखा कार्यालयाच्या कॅशबॉक्समध्ये दोन दिवस ठेवून तिसऱ्या दिवशी बँक कार्यालयात भरणा करावी लागते. यामुळे सिंचन कर्मचाऱ्यांचा ताण व आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी लाभधारक शेतकऱ्याची वसूल केलेली पाणीपट्टी तातडीने बँक भरणा करणे गरजेचे होते. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पाणीपट्टी वसुलीचे काम हाती घेतले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.