Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाना पटोले यांचा गौप्यस्फोट..

नाना पटोले यांचा गौप्यस्फोट..


मुंबई : अमरावती निवडणुकीत 50 कोटी रुपये देऊन निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी कमिशनरला इशारा दिला आणि ते टळलं असा सनसनाटी गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ही रक्कम नंतर 100 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता होती असंही नाना पटोले म्हणाले. मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. नुकत्याच झालेल्या अमरावती विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी विजय प्राप्त केला आहे.

गुप्तचर खात्यातून फोन आला

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, "अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मतं घेतली. पण त्यांना विजयी घोषित करण्यात येत नव्हतं. त्याची मतमोजणी 30 तासांपर्यंत सुरू होती. त्यावेळी मला आयबीमधून एका मित्राचा फोन आला. त्याने सांगितलं की अमरावतीचा निकाल बदलण्याची तयारी सुरू असून त्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम 100 कोटींपर्यंतही जाऊ शकते. हे ऐकल्यानंतर मी डिस्टर्ब झालो, मला रात्रभर झोप आली नाही."

कमिशनरला इशारा दिला

नाना पटोले म्हणाले की, "आयबीमधून मित्राचा कॉल आल्यानंतर मी लागोलाग कमिशनरना कॉल केला आणि त्यांना असं काही केल्यास नोकरी घालवेन, तुझ्या खानदानापर्यंत जाईन असा इशारा दिला. मी धीरजला सांगिलं की प्रमाणपत्र घेऊन बाहेर पड. अशी दादागिरी करावी लागते. ही निवडणूक जिव्हारी लागली म्हणून मी डिस्टर्ब झालो होतो. मी पूर्ण रात्र जागे होतो. सगळा राग होता तो निघाला. आज मात्र आनंद आहे."

तब्बल 30 तासांची मतमोजणी

अमरावती पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, आता इथं काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे  हे विजयी झाले असून त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा 3 हजार 368 मतांनी पराभव केला आहे. बाद फेरीच्या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा 47 हजार 101 इतका निश्चित करण्यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्त करून ते विजयी ठरले. ही मतमोजणी तब्बल 30 तास सुरु होती. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.